पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दलही औदार्य दाखवावे : शरद पवार | पुढारी

पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दलही औदार्य दाखवावे : शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे. यावरून राज्यातील लोकांप्रती त्यांची आस्था वाढल्याचे दिसते. ते गुजरातला गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात तसेच औदार्य महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी दाखवावे, काहीतरी देण्याची घोषणा केली, तर माझ्यासह राज्यातील जनतेला आनंद होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.

मोदीबागेतील निवास्थानी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळणार नाही, असे वाटत असल्यामुळे पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राचे दौरे वाढले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी ते महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येऊन गेले, आता पुन्हा ते पुणे आणि यवतमाळ दौर्‍यावर येणार असल्याचे समजते. यातून त्यांची दिवसेंदिवस महाराष्ट्राविषयीची आस्था वाढत असल्याचे दिसते. ज्याप्रकारे गुजरातला देण्याबाबत त्यांचे औदार्य असते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र दौर्‍यावरती आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी देण्याचे औदार्य दाखवले तर महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल.

उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावरील प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, गोळीबाराची घटना कोणाकडून झाली याबद्दल मला माहिती नाही. पण सध्या सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. गोळीबारासारख्या घटना पोलिस ठाण्यात व्हायला लागल्या आणि सरकार जर बघ्याची भूमिका घेत असेल, तर राज्य कोणत्या दिशेने चाललं आहे? असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना चिंताजनक असल्याचे पवार म्हणाले. इंडिया आघाडीची स्थापना करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी पुढाकार घेतला होता.

पण त्यांनी अचानक एनडीएत जायचा टोकाचा निर्णय का घेतला, याबद्दल काही सांगू शकत नाही. पण जे घडले, ते चांगले झाले नाही. पण बिहारमधील जनतेला त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. याचे परिणाम बिहारच्या निवडणुकीत दिसतील. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये जी धोरणे राबविली ते पाहण्यासाठी दिल्ली आणि देशाबाहेरील जाणकार प्रशासकही येतात. असे असताना सोरेन यांना अटक करून आत टाकले, हे काही योग्य नाही. सत्तेच्या गैरवापराला आज काही मर्यादा राहिली नाही, असेही पवार म्हणाले.

‘आंबेडकरांची भूमिका योग्य’

मविआच्या बैठकीबाबत माझ्या सहकार्‍यांनी मला माहिती दिली. अतिशय चांगली चर्चा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला, तो अतिशय योग्य आहे. केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही, तर काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी जागा कशासाठी जिंकायच्या, कोणत्या कार्यक्रमावर जिंकायच्या यावर चर्चा झाली नाही, तर नंतर मतभेद होतात. मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही योग्य आहे, असेही पवार म्हणाले.

‘अडवाणींची निवड होण्यास उशीर झाला’

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, अडवाणी यांनी संसदेचे सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांना हा पुरस्कार देण्यास उशीर झाला आहे. ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. एखाददुसरा सोडला तर त्यांचा पराभव झाला नाही. मात्र, मी त्यांचं अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना कर्पुरी ठाकुर बिहारचे मुख्यमंत्री होते. ते साधे आणि विनम्र होते. त्यांची निवड योग्य आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button