अखेर तारेत अडकलेल्या बिबट्याच्या बछड्यांची सुटका | पुढारी

अखेर तारेत अडकलेल्या बिबट्याच्या बछड्यांची सुटका

मंचर : पुढारी वृत्तसेवा : गवारीमळा येथे तारेच्या सापळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. 2) सुटका केली. गवारीमळा मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी सोपान दत्तू गवारी यांच्या उसाच्या शेताशेजारी अज्ञाताने लावलेल्या तारेच्या सापळ्यात मध्यम वयाचे बिबट्याचे दोन बछडे अडकले होते. एका बछड्याचे दोन पाय व एका बछड्याचा एक पाय अडकला होता. शेतकरी सोपान गवारी यांनी याबाबत वन खात्याला माहिती दिली.

वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक बी. एच पोत्रे, सी. एस. शिवचरण, ऋषी कोकणे, वनमजूर दशरथ मेंगडे, संपत भोर, शरद जाधव, अरुण खडागळे, रेस्क्यू टीम सदस्य जयेश शहा, अतुल साबळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाल्याने बछडे नागरिकांवर गुरगुरत होते. वन ओधिकारी व कर्मचार्‍यांनी पिंजरा बोलवून सुखरूपरीत्या बछड्यांची तारेतून सुटका करीत त्यांना उपचारासाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

 

Back to top button