शिवजयंती वैचारिक उपक्रमांनी साजरी करा : प्रशासनाचे आवाहन | पुढारी

शिवजयंती वैचारिक उपक्रमांनी साजरी करा : प्रशासनाचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने शिवप्रेमींच्या बैठकीत दिले. तसेच यंदाची शिवजयंती विविध वैचारिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. लहान मुलांचा सहभाग वाढावा, यासाठी शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध, नाट्य स्पर्धा, मर्दानी खेळ असे उपक्रम राबविण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल, असेही नमूद केले.

शहरात येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदींसह शंभरहून अधिक शिवप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे पुतळे व त्यांच्या परिसरात स्वच्छता करावी, विद्युतरोषणाई व सुशोभीकरण करावे, मिरवणूक मार्गावरील वाहतूक कोंडी टाळावी, महापालिकेच्या इमारतीवर विद्युतरोषणाईमध्ये छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची प्रतिमा तयार करावी, मंडळांना विविध प्रकारच्या सुविधा द्याव्यात, अशा सूचना प्रारंभी शिवप्रेमी संघटनांनी केल्या. यावर आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, शिवप्रेमींनी मांडलेल्या सूचनांनुसार महापालिके कडून सर्व सुविधा पुरविल्या जातील. महापालिकेच्या आणि खासगी शाळांमध्येही शिवजयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, मर्दानी खेळ यांसारखे उपक्रम राबविले जाती. पोलिस उपायुक्त गिल म्हणाले, शिवप्रेमींनी शिवजयंतीदिनी डीजेचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा, शिवजयंती उत्साहात पार पडण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

हेही वाचा

Back to top button