कोई सुनता नहीं तो मेरे पास लाओ, मैं उसे समझाऊंगा : अमितेश कुमारांची ठाणे प्रभारींना तंबी | पुढारी

कोई सुनता नहीं तो मेरे पास लाओ, मैं उसे समझाऊंगा : अमितेश कुमारांची ठाणे प्रभारींना तंबी

अशोक मोराळे

पुणे : शहरातील अवैध धंदे शंभर टक्के बंद म्हणजे बंद, पब आणि हॉटेलच्या निर्धारित वेळेतच शटर डाऊन, रेड झालीच तर माझ्या आदेशाची वाट न पाहता संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्षात येऊन बसतील. पोलिस रस्त्यावर दिसले पाहिजेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहा. गुणवत्तापूर्ण कामासाठी झोकून द्या. इसके बावजूद भी अगर कोई सुनता नही हैं, तो उसे मेरे पास लेके आओ, मैं उसे समझाऊंगा, अशी तंबी देत नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच आढावा बैठकीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांची शाळा घेतली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची पहिल्याच बैठकीत ठाणे प्रभारींना तंबी

गुरुवारी (दि. 1) सायंकाळी अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता सर्व पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. या वेळी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, शशिकांत बोराटे, विजयकुमार मगर, आर. राजा, विक्रांत देशमुख, संभाजी कदम, अमोल झेंडे आदी उपस्थित होते.

अमितेश कुमार निर्णयासाठी धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. नागपूर पोलिस आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिलेला आहे. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक कारवाया गाजलेल्या आहेत. पदभार घेतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सर्व पोलिस निरीक्षकांची बैठक बोलावली होती. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात थांबून अद्ययावत केलेले रेकॉर्ड घेऊन तेहतीस पोलिस ठाण्यांचे निरीक्षक बैठकीला हजर होते. अमितेश कुमार यांनी स्वतः प्रत्येक ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडून हद्दीतील संवेदनशील ठिकाणे, खून, खुनाचे प्रयत्न, महिला अत्याचारा संदर्भातील गुन्हे, मिसिंग, रेकॉर्डवरील टॉप 20 गुन्हेगार, बंदोबस्त, मंजूर मनुष्यबळ, प्रत्यक्षात उपलब्ध असलेले मनुष्यबळ, किती दिवसांपासून प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. तब्बल साडेतीन तासांपेक्षा अधिक वेळ ही बैठक सुरू होती.

‘…तर नियंत्रण कक्षात येऊन बसावे लागणार’

सर्व पोलिस निरीक्षकांना सूचना करीत शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे शंभर टक्के बंद राहतील. हॉटेल निर्धारित नियमानुसारच चालू राहतील. अप्रत्यक्षपणे पाठीमागून कोणी-कोणाला मदत करणार नाही. असे कोणी करीत असले तर त्यांना सोडले जाणार नाही. एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई झाली, तर त्या पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍याने माझ्या आदेशाची वाट न पाहता स्वतः नियंत्रण कक्षात येऊन बसावे. अमितेश कुमारांच्या या कडक आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना चांगलीच धडकी भरली आहे.

‘महिला सुरक्षिततेबाबत सतर्क राहा’

महिलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहा. महिला अत्याचारांबाबतीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करा. पोलिस रस्त्यावर दिसले पाहिजेत. पुणेकर नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी पायी गस्त घाला. तुमच्या सर्वांकडून मला गुणवत्तापूर्ण कामाची अपेक्षा आहे. त्यासाठी पूर्ण वेळ झोकून काम करा, असे देखील अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

‘रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गुन्हा घडता कामा नये’

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गुन्हा घडता कामा नये, त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या. दररोज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टॉप ट्वेंटी गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात आणून बसवा. खून, खुनाचे प्रयत्न असे गुन्हे घडणार नाहीत, याबाबत प्रयत्न करा. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षात शरीराविरुद्धचे किती गुन्हे घडले, याचा देखील पोलिस आयुक्तांनी आढावा घेतला. गुन्हा करणारे आरोपी रेकॉर्डवरील असतील तर त्यांच्यावर यापूर्वी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई झाली, याबाबत माहिती घेतली. त्यामुळे पुढील कालावधीत प्रत्येक पोलिस अधिकार्‍याला आपले कर्तव्य सिद्ध करावे लागणार, हे मात्र नक्की असल्याचे दिसून येते.

डॉ. के व्यंकटेशम यांच्या बैठकीची आठवण

पुणे शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आठवडा आढावा बैठक म्हटली, की अनेक पोलिस अधिकार्‍यांना घाम फुटत असे. त्यांच्या बैठकीची एवढी चर्चा होती, की चार दिवसांपूर्वीच पोलिस निरीक्षक बैठकीची तयारी करून अभ्यास करीत असत. कारण, कोणत्या वेळी ते काय विचारून झाडाझडती घेतील, याचा काही नेम नसे. त्यामुळे बर्‍याच वर्षांतून पोलिस अधिकार्‍यांनी अमितेश कुमार यांच्या बैठकीसाठी व्यंकटेशम यांच्या बैठकीप्रमाणे तयारी केल्याची दिवसभर चर्चा पोलिस आयुक्तालयात रंगली होती. एवढेच नाही, तर कर्मचारी देखील बैठकीत नेमके काय झाले, याच्याकडे कान लावून होते.

गुन्हे शाखेकडून आदेश

गुन्हे शाखेकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश काढण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी हा आदेश काढला आहे. शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. दररोज करण्याच्या कारवाईचे टार्गेट देण्यात आले आहे. जास्तीत जास्त कारवाई करण्यास आदेशात सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर गुन्हे शाखेचे सर्व युनिट यांना त्यांनी दिवसभरात अवैध धंद्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल दररोज सकाळी दहा वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयाला बिनचूकपणे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा

Back to top button