मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'ताकही फुंकून प्यायचे आम्ही ठरवले आहे. आता उत्तर प्रदेशात अखिलेश यादव हेही इंडिया आघाडीतून वेगळे झाले आहेत. 'इंडिया' आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे 'मविआ'ची 'इंडिया' होऊ देणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही देत वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 'मविआ'सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
महाविकास आघाडीची बैठक शुक्रवारी येथील हॉटेल ट्रायडंट येथे झाली. आंबेडकर यांना काही कामानिमित्त पूर्णवेळ बैठकीत उपस्थित राहता न आल्याने ते बैठक पूर्ण होण्याआधी बाहेर आले. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हेही त्यांच्यासोबत होतेे. चर्चा समाधानकारक झाली का, असा प्रश्न केला असता आंबेडकर म्हणाले, माझा चेहरा हा नेहमी हसराच असतो. मी आयुष्यात कधीच दु:खी होत नाही. त्यामुळे माझ्या चेहर्यावर जाऊ नका, असा मिस्किल शेरा त्यांनी मारला.
'मविआ'ची इंडिया आघाडी होऊ नये हे आमचे बैठकीत ठरले आहे. आम्ही तशी दक्षता घेऊ. माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पक्ष आणि
काँग्रेस हे इंडिया आघाडीतील शेवटचे सहकारी बाजूला गेले आहेत. तसे होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मात्र तसे झाले असल्याची माझी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर 'मविआ'चेही तसे होऊ नये, असे मला वाटते. आजच्या बैठकीत आम्ही पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा चर्चेत घेतला आहे. त्यावर निम्मी चर्चा झाली आहे. जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यामुळे ताकही फुंकून प्यायचे हे मी ठरवले आहे, असे ते म्हणाले. बैठकीत आम्ही जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर तीनही पक्ष अंतर्गत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये आणखी मुद्दे जोडायचे असतील, तर ते जोडले जातील आणि नंतर जो मसुदा तयार होईल तो अंतिम असेल, असे आंबेडकर म्हणाले.
'मविआ'च्या आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मुख्य म्हणजे सकारात्मक चर्चा झाली. आपण एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जायचे ठरल्याचे खा. संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, सध्या देशात संविधान विरोधात वातावरण निर्माण केले आहे. ते रोखण्याबरोबरच भाजपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मदत होईल, अशी कोणतीही पावले उचलली जाणार नाहीत यावर आमचे एकमत झाले आहे. देशात सध्याचे हुकूमशाही, एकाधिकारशाही आणि फसवणुकीचे जे वातावरण सुरू आहे, ते बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणे गरजेचे आहे.
बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे) विनायक राऊत तर वंचितच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.