रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत घंटानाद आंदोलन | पुढारी

रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत घंटानाद आंदोलन

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणार्‍या चौकशीच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वतीने थेट रस्त्यावर उतरुन निषेध करण्यात आला. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या मांडून घंंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच, या वेळी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सरकारकडून सूडाची कारवाई
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या प्रश्नावर नुकतीच पुणे ते नागपूर अशी 800 किलोमीटर अंतरांची युवा संघर्ष यात्रा काढून सरकारचे लक्ष त्या प्रश्नांकडे वेधले होते.

तसेच, शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यांना रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावला आहे, असा आरोप शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला आहे.

राज्य सहकारी बँक प्रकरणातील अनेक जण भाजपात

आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून केली जात आहे, त्या बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहिली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत. त्या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून, यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु, त्यांच्या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही. मात्र, रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची चौकशी केली जात आहे.

राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात रोहित पवार यांचा संबंध नाही. केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून रोहित पवार यांची चौकशी करत आहे, असा आरोप कामठे यांनी केला आहे. आंदोलनात शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, शकुंतला भाट, गणेश भोंडवे, सुलक्षणा धर, शिरीष जाधव, सागर चिंचवडे, विश्रांती पाडळे, विजयकुमार पिरंगुटे, मयूर जाधव, प्रशांत सपकाळ, अल्ताफ शेख, संदीप शिंदे, विशाल जाधव, राजू खंडागळे, विवेक विधाते आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button