मागणी नसताना ‘उजनी’तून सोलापूरला पाणी | पुढारी

मागणी नसताना ‘उजनी’तून सोलापूरला पाणी

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : गरज व मागणी नसताना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तसेच सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना खुश करण्यासाठी उजनी धरणातून सोलापूरसाठी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे. पुण्यातील धरणातून उजनी धरणात 10 टीएमसी पाण्याची दोन आवर्तने देण्यात यावीत. तसेच उजनी धरणाच्या सल्लागार समितीवर धरणग्रस्तांचे सदस्य घ्यावेत, अशी मागणी भिगवण (ता. इंदापूर) येथील सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली.

उजनी धरण संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 1) भिगवण येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी इंदापूरसह करमाळा, दौंड, कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी महारुद्र पाटील, शिवाजी बंडगर, किरण गोफणे, निलेश देवकर, प्रा. रामदास झोळ, सविता राजेभोसले, अशोक शिंदे, सुहास गलांडे, आबासाहेब बंडगर, शरद चितारे आदींची भाषणे झाली. यावर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ 60.66 टक्केच भरले होते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन व काटकसर करणे गरजेचे होते. मात्र धरणातून सातत्याने सोडण्यात आल्याने धरणग्रस्तांची चिंता वाढली आहे. सध्या धरणात केवळ उणे 6 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही अवघ्या 10 दिवसांच्या अंतराने दुसरे आवर्तन सोडण्यात आल्याने धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातूनच आता आंदोलनाची ठिणगी पडली आहे.

वास्तविक उजनी धरणाच्या निर्मितीसाठी येथील धरणग्रस्तांनी प्रचंड त्याग केला आहे. त्यांनी डोळ्यांदेखत घरे, जमिनी, गावे पाण्याखाली गेलेली पाहिली आहेत. तरीही पाण्यासाठी सातत्याने भीक मागावी लागत आहे, अशा उद्वीग्न भावना आंदोलनावेळी व्यक्त करण्यात आल्या. पिण्याच्या पाण्याला विरोध नाही; मात्र समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करून त्यातून पाणी घ्यावे, असा मतप्रवाह आंदोलनात दिसला. तसेच उजनीच्या पाण्याबाबत राजकारणातून न्याय मिळणार नसल्याने न्यायालयात धाव घेणार असल्याचेही या आंदोलनात जाहीर करण्यात आले.

कालवा सल्लागार समितीवर आमदारांचा भरणा असल्याने एका सुरात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील दोन, करमाळा तालुक्यातील दोन व कर्जत तालुक्यातील एका उजनी धरणग्रस्त प्रतिनिधीची निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. समितीच्या वतीने प्रशासनाला लेखी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.

हेही वाचा :

Back to top button