रघुराम, सिंह, चक्रवर्ती व गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर | पुढारी

रघुराम, सिंह, चक्रवर्ती व गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे 2024 चा दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ आयआयएम, बंगळुरूचे माजी संचालक व नॅशनल रेल अ‍ॅण्ड ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूटचे प्रा.जी. रघुराम, मॅगॅसेसे पुरस्कार विजेते व जलसंरक्षक डॉ. राजेंद्र सिंह, शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती व बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेफ वॉटर अ‍ॅण्ड सॅनिटेशन विभागाचे प्राध्यापक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक गाडगीळ यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड यांनी दिली.

पुरस्काराचे हे 20 वे वर्ष आहे. हा समारंभ उद्या शनिवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता एमआयटीमध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर व एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पायभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यांच्यातील आव्हाने हाताळण्यात विशेष यश संपादन केल्याबद्दल प्रा. जी. रघुराम यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. 8 हजार 600 तलावांची निर्मिती, राजस्थानातील पाच नद्यांचे पुनरुज्जीवन व जलसंधारण कार्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह व शास्त्रीय संगीतातून सार्वजनिक प्रबोधन कार्याबद्दल कौशिकी चक्रवर्ती यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ने गौरविण्यात येईल. त्याच प्रमाणे उष्णता हस्तांतरण द्रव गतिशीलता आणि विकासासाठी तंत्रज्ञान डिझाईन या क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्याबद्दल वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक गाडगीळ यांना ‘भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button