जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या | पुढारी

जुन्नर : अनंत नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा, व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या

जुन्नर/नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

पिंपरखेड (ता. शिरूर, जि. पुणे) येथे बँकेमध्ये सशस्त्र दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच नजीकच्या जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या १४ नंबर येथे अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी (दि. २४) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तीने पतसंस्थेत प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली. यास भोर यांनी विरोध दर्शविला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नारायणगाव या ठिकाणी नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

Back to top button