अखेर उड्डाणपुलाखालील जागेने घेतला मोकळा श्वास : नागरिकांमध्ये समाधान | पुढारी

अखेर उड्डाणपुलाखालील जागेने घेतला मोकळा श्वास : नागरिकांमध्ये समाधान

धायरी : पुढारी वृत्तसेवा : ‘पार्किंग, नोकरदार की नागरिकांसाठी ?’ या आशयाचे वृत्त ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने व सिंहगड रोड वाहतूक शाखेने त्वरित दखल घेतली. या उड्डाणपुलाखाली रोजच्या रोज होत असलेला नोकरदार यांच्या दुचाकींचा ढीग उचलला. त्यामुळे या उड्डाणपुलाखालील जागेने आता मोकळा श्वास घेतला आहे. सिंहगड रोड परिसरातील धायरी फाटा वडगाव येथील मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी स्व. आ. रमेशभाऊ वांजळे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. हा उड्डाणपूल त्रिमूर्ती हॉस्पिटलपासून लगड मळ्यापर्यंत आहे.

या उड्डाणपुलाखाली परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यामुळे येथे सतत ग्रामस्थ, पर्यटकांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याकरिता नागरिकांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी महापालिकेच्या वतीने उड्डाणपुलाखाली पार्किंग दहा वर्षांपासून करण्यात आलेले आहे. परंतु या पार्किंगचा उपयोग येथे येणा-या ग्राहकांच्या ग्रामस्थांच्या व नागरिकांऐवजी नोकरदार लोकांच्या दुचाकी लावण्यासाठीच उपयोग होता. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कांबळे म्हणाले, या परिसरात ग्रामस्थ, नागरिक व ग्राहकांची, रुग्णांची वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे ग्राहकांनी या बाजारपेठेकडे पाठ फिरविल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील दुकानदारांच्या समोर रस्त्यावर नागरिक व ग्राहकांची वाहने उभी करण्यासाठी प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करून द्यावी.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुचाकींचा ढीग लागला होता. यामुळे परिसरात कचरा झाला होता. येथे स्वच्छता करणे अवघड झाले होते. तसेच येथे गैरप्रकार वाढीस लागले होते. नागरिकांच्या मागणीमुळे ही वाहने येथून हलविण्यात आली.

– संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button