अंजिराला बसतोय पाणीटंचाईचा फटका | पुढारी

अंजिराला बसतोय पाणीटंचाईचा फटका

दिवे : पुढारी वृत्तसेवा : परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. सध्या विहिरींची पाणीपातळी घटली आहे. शेततळ्यांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे अंजीरबागांना पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या अंजिराचा मीठा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अंजीर उत्पादकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बागांना पाण्याची कमतरता भासत असल्याने अंजिराच्या आकारमानावर परिणाम झाल्याचे शेतकरी समीर काळे यांनी सांगितले. बागेत फळधारणा देखील अत्यल्प झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अंजीरबागेला उत्पादन खर्च जास्त येतो, त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सध्या दिवे, काळेवाडी, जाधववाडी, चिंचावले परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला.

पुरंदर उपसा जलसिंचन योजना सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. योजना सुरू झाल्यानंतर वाघापूर-चौफुला येथील पंप हाऊसमधील दोन पंप सुरू करून गुर्‍होळी, सिंगापूर, उदाचीवाडी, वनपुरी, सोनोरी आणि दिवे या परिसराला समान पाणी वाटप करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. असे झाले तरच येथील अंजीर, सीताफळबागांना जीवदान मिळेल. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिवे परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

चार्‍याचा प्रश्नदेखील गंभीर
दिवसेंदिवस जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे चढ्या दराने हिरवा चारा खरेदी करावा लागत आहे. सध्या उसाच्या एका भेळ्यासाठी तब्बल 70 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे. पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. चारा डेपो अथवा चारा छावण्या सुरू केल्या, तरच येथील पशुधन वाचणार आहे.

Back to top button