Nashik : उमेदवार झाले बहु, राजकीय पक्षांनी सरसावले बाहु! | पुढारी

Nashik : उमेदवार झाले बहु, राजकीय पक्षांनी सरसावले बाहु!

नाशिक : आसिफ सय्यद

आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ महायुती पाठोपाठ विरोधक महाआघाडीतील घटक पक्षांमधील रस्सीखेच अंतर्गत संघर्ष वाढविणारी ठरली आहे. महायुतीतील शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकमधून हॅटट्रीक करण्याच्या तयारीत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. तर, महाविकास आघाडीतही या जागेवरून संघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची उमेदवारीही जाहीर केली आहे तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गट व काँग्रेसने देखील या जागेवर दावा सांगितल्याने निवडणुकीपूर्वीच उमेदवारीवरून नाशिकचे रण पेटल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिकमध्ये उद्घाटन झाले. या दौऱ्यात मोदींनी श्री काळाराम दर्शन तसेच गोदाआरतीही केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नाशिकच नव्हे तर, राज्यात राजकीय हवा निर्माण केल्याचा दावा भाजपेयींकडून केला जात आहे. मोदींपाठोपाठ उध्दव ठाकरे यांनी देखील १९९४ नंतर तब्बल २८ वर्षांनी पुन्हा एकदा नाशिकमध्ये शिवसेने(ठाकरे गटा)चे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये भरवत राज्यात पुन्हा ठाकरे गटाची सत्ता येण्यासाठी जगदंबेला साकडे घातले. या अधिवेशनापूर्वी ठाकरे यांनी श्री काळाराम दर्शन तसेच गोदाआरती करत अयोध्येतील मोदींच्या सोहळ्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाशिकमधून देश आणि राज्य पातळीवरील राजकारणाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत महायुतीच्या रुपाने राज्याच्या सत्तेत सहभागी आहेत. तर शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार गट काँग्रेससोबत महाआघाडीत सामील होत विरोधात उभे ठाकले आहे.

महायुतीकडून भाजप रिंगणात?
नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. मागील दोन पंचवार्षिकमध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर निवडणुकीचे मैदान ते पुन्हा मारणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर मित्रपक्ष भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी लोकसभा नाशिकमधून लढावी अशी मागणी नाशिकच्या काही महंतांनी केली होती. मोदी जर नाशिकहून निवडणुकीसाठी उभे राहिले तर नाशिकच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. भाजपकडून दिनकर पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. तर आ. सीमा हिरे याही निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. समीर भुजबळ हे २००९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून निवडून आले होते. सद्यस्थितीत त्यांच्याकडे अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते मुंबईतून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र नुकतेच त्यांनी निवडणूक लढणार तर नाशिकमध्येच असे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाआघाडीकडून शिवसेना की राष्ट्रवादी?
महाआघाडीत ठाकरे गटाचा नाशिकच्या जागेवर मूळ दावा आहे. किंबहुना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच नाशिकच्या जागेसाठी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. करंजकर हे गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने नुकतीच बैठक घेत नाशिकच्या जागेवर दावा केला. शरद पवार गटाकडून माजी खा. देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार नाशिकला आल्यावर पिंगळे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे हेही शरद पवार गटाचे प्रभावी उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. महाआघाडीत नाशिकच्या जागेवरून ठाकरे गट व शरद पवार गटात रस्सीखेच सुरू असताना काँग्रेसने देखील या जागेवर दावा सांगितला आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरणार
आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात मनसे, वंचित आणि अन्य छोट्या पक्षांना दुर्लक्षून चालणार नाही. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना तब्बल १ लाख ९ हजार ९८१ मतं मिळाली होती. त्यामुळे याही निवडणुकीत वंचित फॅक्टर महत्वपूर्ण ठरणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते, तरी ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांवर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी मनसेने केली आहे. मनसेकडून माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचे नाव आघाडीवर आहे. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून माजी खा.संभाजी राजे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला जात आहे. मराठवाड्यातून की नाशिकमधून निवडणूक लढवायची याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. एमआयएम नाशिकमधून उमेदवार देणार का हे पाहणेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा:

Back to top button