टक्केवारीत अडकली ‘सॅनिटरी’ची निविदा; काँग्रेसचा आरोप | पुढारी

टक्केवारीत अडकली ‘सॅनिटरी’ची निविदा; काँग्रेसचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याबाहेरील एका खासदाराच्या आणि शहरातील एका आमदाराच्या टक्केवारीमध्ये सॅनिटरी नॅपकिनची निविदा प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिनपासून वंचित आहेत. परिणामी, विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या गोरगरीब विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेकडून विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिनची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कोरोनाच्या कालावधीत महापालिकेतील शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप बंद झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी सदर नॅपकिनचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या स्टेझी हायजीन या कंपनीला ठेका मिळावा, यासाठी पुणे जिल्ह्याबाहेरील शिर्डीच्या शिवसेना (शिंदे गट) खासदाराने प्रयत्न केला. तसेच शहरातील भाजपच्या एका शिवीगाळ करणार्‍या व पोलिसाच्या कानशिलात मारणार्‍या आमदाराने मे. कोलेक्स या कंपनीला ठेका मिळावा, यासाठी प्रयत्न केले.

या दोन्ही लोकप्रतिनिधींनी टक्केवारीसाठी आपापल्या ठेकेदाराला निविदा मिळावी म्हणून एकमेकांच्या ठेकेदारांविरोधात लेटरहेडवर लेखी तक्रारी केल्या. या वादात सॅनिटरी नॅपकिनची खरेदी रखडली आहे. या निविदा प्रक्रियेत दोन्ही लोकप्रतिनिधींनी भांडार विभागाच्या उपायुक्तांवर आरोप केले. या सर्व प्रकारामुळे अद्याप महापालिका प्रशासनाने सॅनिटरी नॅपकिन खरेदी केलेली नाही. सत्ताधारी खासदार व आमदारांना कशात पैसे खावेत, कशात टक्केवारी मिळवावी, याचेही भान राहिलेले नाही, असा आरोप करीत भाजपने व मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींची कानउघाडणी करावी, अशी मागणी शिंदे व तिवारी यांनी केली. या निविदा प्रक्रियेत खासदार आणि आमदार यांच्याकडून झालेला पत्रव्यवहार गृह खात्याने तपासला पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी तसेच महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थेट उत्पादक कंपनीकडून खास बाब म्हणून सॅनिटरी नॅपकिनची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सीएसआरच्या माध्यमातून घेणार सॅनिटरी नॅपकिन

महापालिका प्रशासनाने सीएसआरच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एका स्वयंसेवी संस्थेने दर महिन्याला पंचवीस हजार सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. त्यांच्याकडून सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाल्यानंतर ते शाळांमध्ये वितरित केले जाणार आहे, अशी माहीती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा

Back to top button