पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन (एक्साइज) शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोवा राज्यात जाऊन बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या वेळी देशी दारूच्या 21 लाखांच्या 60 हजार बाटल्या आणि 15 लाखांचा टेम्पो यासह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे एक्साइजच्या 'फ' (पिंपरी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. झुल्फिकार ताज आली चौधरी (68, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), अमित ठाकूर आहेर (30, रा. बोरमाळ, पारसवाडा, पो. कोचाई, ता. तलासरी, जि. पालघर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्यांच्यासह इतर दोघांवर देखील एक्साइजने गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. पुणे एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई – पुणे महामार्गावर मामुर्डी परिसरात अवैध मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी संशयित ट्रकची पाहणी केली असता गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारूच्या मद्याची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे समोर आले. ट्रकमध्ये रॉकेट संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60 हजार बाटल्या (600 खोके) मिळून आल्या. यात बनावट देशी मद्याचा 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ट्रकमध्ये मिळला. यामध्ये 15 लाखांच्या वाहनासह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 23 जानेवारीला गुन्हा दाखल केला.
दरम्यान जप्त बनावट देशी मद्य हे गोव्यातील वडावल येथे पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात असून त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे समजले. त्यानुसार एक्साइजच्या पथकाने गोव्यात कारवाई केली. गोवा पोलिसांची मदत घेऊन उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोळी तालुक्यातील वडावल येथील बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घातला. यात बनावट देशी मद्यासाठीचा एक लाख 34 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल सीलबंद केला. आत्तापर्यंत या कारवाईत एकूण 38 लाख 14 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. झुल्फिकार याला गुन्ह्याच्या ठिकाणी व अमित याला गोव्यात जाऊन तपासादरम्यान अटक केली. एक्साइजच्या पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे, सासवडचे निरीक्षक प्रवीण शेलार, रोहित माने, आर. एम. सुपेकर, डी. वाय. गोलेकर, शीतल पवार, नम्रता वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बातमीदारामार्फत गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार टेम्पो पकडण्यात आला. चौकशीदरम्यान गोवा येथे हे मद्य तयार केले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने थेट गोव्यात छापा टाकून कारवाई केली आहे.
– चरणसिंग राजपूत, अधीक्षक, उत्पादन शुल्क
हेही वाचा