धर्मादायची कारणे दाखवा नोटीस; सर्व्हन्ट्स ऑफ इंडियात खळबळ   | पुढारी

धर्मादायची कारणे दाखवा नोटीस; सर्व्हन्ट्स ऑफ इंडियात खळबळ  

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये विश्वस्तांनी केलेल्या भोंगळ कारभाराची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी संस्थेला कारणे दाखवा नोटीस काढली असून, 16 फेब्रुवारीपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे आदेश दिले आहेत.  सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्वातंत्र्यापूर्वी सार्वजनिक आणि सामाजिक संस्था झाली. जिचे उदात्त धोरण देशाला आर्थिक, राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक स्तर उंचाविण्यासाठीचे होते.
आजीवन सदस्य म्हणून आयुष्य बहाल केलेल्या अनेक थोर समाजसेवकांनी  काम करीत त्यांच्या कामाच्या प्रभावाने देशव्यापी संस्था होऊन भारतभर जमिनी तसेच इमारती उभारता आल्या. मात्र, आताच्या विश्वस्तांनी त्यावर नजर ठेवून आपले कुटुंबांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याबाबत हरकतदार प्रवीणकुमार राऊत यांनी पुणे धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला. त्याची दखल घेऊन ही नोटीस काढण्यात आली आहे.

रानडेंच्या मदतीने केली दिशाभूल…

देशमुख यांनी डॉ. अजित रानडे यांच्या मदतीने धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल जुलै 2023 मध्ये केली. कारण मिलिंद देशमुख, दामोदर साहू, पी. के. द्विवेदी यांनी उत्तराखंड येथे कोरम पूर्ण नसताना स्वतःच्या मुलांना संस्थेत गुपचूप सदस्य करण्याची प्रक्रिया केली. तसेच अमरीश तिवारी यांच्या मुलालासुद्धा सदस्य करून घेऊ, असे आश्वासन देऊन त्यांचे मत घेतले गेले.
अमरीश तिवारी हे पी. के. द्विवेदी यांचे नातेवाईक आहेत. अशा सर्वांनी संस्था गिळंकृत करण्यासाठी केलेल्या षड्यंत्राला नेवे यांनी विरोध केला असता म्हणून प्रवीणकुमार राऊत यांना आजीवन सदस्य केले.  त्यामुळे त्यांनी संस्थेच्या अबाधितपणा राखण्याची शपथ घेतल्याने त्यांनी हा लढा उभारला आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी त्यांनी अर्ज केला. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी विश्वस्तांवर नोटीस बजाविण्याचे आदेश लगेच पारीत केल्याचे राऊत यांचे वकील अ‍ॅड. राजेश ठाकूर यांनी सांगितले.

कुटुंबीयांना संस्थेत घुसविण्यासाठी वाट्टेल ते

दामोदर साहू यांनासुद्धा त्यांचा मुलगा सुधांशुशेखर साहू याला वारस म्हणून आजीवन सदस्य करून रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. ज्याची पात्रता ही संविधानाच्या नियमानुसार नाही. तसेच पी. के. द्विवेदी यांचा नातू प्रतीक द्विवेदी याला आजीवन सदस्य करून देशमुखांनी आपल्या बाजूने मताधिक्य करून घेण्याचा पूर्वनियोजित डाव दिवंगत रमेशचंद्र नेवे यांच्या निधनानंतर रचला गेला. याला आत्मानंद मिश्रा यांनी विरोध केला. धर्मादायमध्ये मामला दाखल केला.

देशमुख यांची बनवाबनवी सुरूच

संस्थेचे सचिव मिलिंद भगवान देशमुख यांनी त्यांची बहीण अ‍ॅड. रश्मी सावंत, मेहुणे सागर काळे यांच्यानंतर मुलगा चिन्मय देशमुख यासह आता (मेहुणीचा मुलगा) शिवम जगताप यालाही  संस्थेच्या आवारात नोकरी दिली. त्यानंतर लगेच मुलगा चिन्मय देशमुख याला आजीवन सदस्य करण्यासाठी  धर्मादायमध्ये बदल अर्ज दाखल केला. ही सर्व प्रक्रिया अध्यक्ष दामोदर साहू यांच्या परवानगीने खुलेआम सुरू आहे.

अ‍ॅड. सावंत यांचे  राऊत यांना मेसेज

प्रकरण गंभीर होत आहे, याची कल्पना येताच मिलिंद देशमुख यांच्या भगिनी अ‍ॅड. रश्मी सावंत यांनी लगेच प्रवीण राऊत यांच्यासोबत सलोखा साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठविले. प्रवीणकुमार राऊत म्हणाले की, संस्था अबाधित राहावी म्हणून मी मिलिंद देशमुख आणि दामोदर साहू यांना अनेकदा विनवणी केली होती. मात्र, त्यावर दोघांनी संस्था घर की अमानत असल्यागत वागणूक दिली.
 धर्मादाय आयुक्तांकडे प्रकरण दाखल झाल्यावर सर्वत्र खळबळ माजली. नेवे यांच्या नैतिक प्रभावामुळे संस्था सुरळीत होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर संस्था कौटुंबिक होण्याच्या मार्गावर आहे. ती अबाधित राहावी म्हणून मी हा लढा पुढे नेत आहे. ही न्याय प्रक्रिया देशभरातील सामाजिक चळवळ करणार्‍या लढवय्यांना प्रेरणा देणारी आहे. त्यासाठी अ‍ॅड. गजानन गवई, अ‍ॅड. अश्विनी ठाकरे, अ‍ॅड. रमाकांत वैदकर, अ‍ॅड. रवी वर्धे हे मला तन, मन, धनाने पाठिंबा देत आहेत.
-प्रवीणकुमार राऊत, हरकतदार
हेही वाचा

Back to top button