बहुरूपी अशोकमामा | पुढारी

बहुरूपी अशोकमामा

आयुष्याच्या 76 वर्षांपैकी जवळपास 70 वर्षे आपल्या अभिनयाला देऊन, या कलेस एका उंचीवर नेऊन ठेवणार्‍या अशोक सराफ यांना राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार मिळणे, ही स्वाभाविकपणे आनंदाचीच गोष्ट आहे. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमांत लीलया वावरणार्‍या या कलावंतास नाट्य व चित्रपट क्षेत्रात ‘अशोकमामा’ म्हणूनच ओळखले जाते. आजकाल कोणीही कलावंत एखादी मालिका वा चित्रपट मिळाला, तरी त्याच्या अल्पायुषी लोकप्रियतेमुळे स्वतःला ‘ग्रेट’ समजू लागतो. अतिप्रसिद्धीमुळे कलावंतांची अनेकदा माती होते. कारकिर्दीत प्रचंड यश मिळूनही अशोक सराफ मात्र अत्यंत निगर्वी, साधे आणि निर्मळ राहिले आहेत. त्यांच्या डोक्यात कधीही हवा गेली नाही की, स्टारचे नखरे त्यांनी कधी दाखवले नाहीत. मुळात ज्यांनी कलेशिवाय आयुष्यात कशालाच महत्त्व दिले नाही, असे प्रख्यात रंगकर्मी गोपीनाथ सावकार हे सराफ यांचे मामा. त्यांच्या नाटक कंपनीत ते स्टेजवर अक्षरशः रांगले आहेत. वयाच्या सातव्या वर्षी एकांकिकेत त्यांनी काम केले आणि दहाव्या वर्षी ‘संशयकल्लोळ’ नाटकामध्ये भादव्याची भूमिका त्यांनी केली. वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती देवयानी’ नाटकात त्याकाळचे प्रसिद्ध अभिनेते छोटू सावंत काम करत; परंतु त्यांना अर्धांगवायू झाल्यामुळे अशोकमामा यांनी त्यांची विदूषकाची भूमिका केली. सुरुवातीलाच मास्टर दत्ताराम रामदास कामत यांच्यासारख्या कलावंतांबरोबर काम करायला मिळाले आणि त्यामुळे अभिनयाच्या कुठल्याही पाठशाळेत न जाता, थेट प्रॅक्टिकल्समधूनच ते शिकत गेले. वाक्याला लय कशी असावी, पॉझ कुठे घ्यायचा, एखादा प्रसंग विकसित कसा करायचा, या सर्व गोष्टी सावकार यांच्याकडूनच ते शिकले. महाराष्ट्रात एकेकाळी दिनकर कामण्णा, दामुअण्णा मालवणकर, शरद तळवलकर, राजा गोसावी, वसंत शिंदे अशा कलावंतांनी आपल्या कॉमेडीने असंख्य रसिकांचे रंजन केले. सराफ यांनी प्रारंभी प्रख्यात दिग्दर्शक गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ चित्रपटात डिटेक्टिव्हची भूमिका केली; परंतु नाट्याभिनयाच्या सवयीमुळे त्यांचे हे काम लक्षवेधी झाले. चित्रपटात क्लोजअपचे व्यवधान ठेवून वेगळ्या पद्धतीने काम करावे लागते, याचे भान त्यांना नंतर आले. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ चित्रपटातील सखारामच्या भूमिकेमुळे ‘अशोक सराफ’ हे नाव प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले. दादांचा अभिनय लोकनाट्याच्या धाटणीचा, हे लक्षात घेऊन त्यास प्रतिसाद कसा द्यायचा, याचे भान ठेवून त्यांनी त्यात भूमिका केली. ‘अशी ही बनवाबनवी’मधील त्यांची ‘धनंजय माने’ ही व्यक्तिरेखा आजही लोकांच्या स्मरणात आहे. दुधाच्या रांगेत खूप वेळ लागणार, हे लक्षात आल्यानंतर पोटात कळ येऊन बसकण मारणारा धनंजय माने, ‘धनंजय माने इथेच राहतात का,’ हा मराठीतल्या हिट संवादांपैकी एक संवाद आहे. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुधीर जोशी आणि सचिन पिळगावकर जो धुमाकूळ घालतात, तो कमालीचा आहे. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले आणि अशोक सराफ यांची जोडी कमालीची हिट ठरली होती, हे अगदी ठळकपणे याठिकाणी नमूद करावेच लागेल.

‘प्यार किये जा’ या चित्रपटावरून बनवलेल्या ‘धूमधडाका’मधील अशोकमामांच्या म्हातार्‍याच्या भूमिकेतील ‘वख्खा विख्खी वुख्खू’ यामुळे प्रचंड मजा येते. तोंडात स्मोकिंग पाईप घेऊन संवाद म्हणायचे होते. पाईपमधील तंबाखू तीव्र असल्यामुळे तो ओढल्यानंतर घशातून ठसका बाहेर येतो, हे लक्षात घेऊन अशोकमामांनी या प्रकारे सतत ठसका देऊन बोलण्याची शैली या व्यक्तिरेखेला बहाल केली. एखादा बुद्धिमान अभिनेताच हे करू शकतो. एकीकडे ‘हमीदाबाईची कोठी’सारख्या नाटकात थोर दिग्दर्शक विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अप्रतिम भूमिका केली. त्याचबरोबर ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘सारखं छातीत दुखतंय’, ‘व्हॅक्युम क्लीनर’ अशा नाटकांतून वेगवेगळी पात्रे साकारताना, रंगभूमीचा जिवंत अनुभव ते सतत घेत राहिले. छोटी बडी बातें, हम पाँच यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांतून घराघरांत पोहोचले. पन्नाशी उलटल्यानंतरही प्रचंड थकवणार्‍या दूरचित्रवाणी माध्यमात जीव ओतून काम करणारा हा कलाकार. हे केवळ सचिन व महेश कोठारे यांच्या सिनेमांपुरते होते, असे समजण्याचे कारण नाही. ‘खरा वारसदार’ या चित्रपटात एक मानसिक रुग्ण हळूहळू सुधारत कसा जातो, याचे टप्पे त्यांनी परिणामकारकपणे दाखवले. सुरुवातीला कसाबसा तुटक बोलणारा तो वेडा पुढे आत्मविश्वास आल्यानंतर पूर्ण वाक्य नीटपणे कसा बोलतो, हेसुद्धा त्यांनी दाखवले. ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटात कोकणी भाषेत आणि हेलात बोलणारा बावळट प्रोफेसर धोंड त्यांनी सुरेखपणे साकारला. ‘चौकट राजा’मधील गण्याच्या व्यक्तिरेखेतील हळवी बाजू किंवा ‘कळत नकळत’मध्ये लहान मुलीचा रुसवा गाणे म्हणून काढणारा सदूमामा अथवा ‘एक उनाड दिवस’ या चित्रपटातील करारी स्वभावाचा उद्योगपती. व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय कसा द्यायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. बेटी नंबर वन, कोयला, जोरू का गुलाम, येस बॉस, करण अर्जुन, सिंघम यासारख्या हिंदी चित्रपटांतदेखील त्यांनी ठसा उमटवला. ‘सिंघम’मधील हेड कॉन्स्टेबल सावरकर दोन-चार प्रसंगांतही भाव खाऊन जातो. शाहरुखबरोबर काम करतानाही त्यांना आनंद मिळाला; मात्र अलीकडे चांगल्या संहिता मिळत नाहीत, अशी खंतही ते व्यक्त करत असतात. अनेक कलावंत काही वर्षेच टिकतात आणि नंतर कालबाह्य होतात. अशोक सराफ यांनी 1970 पासून चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली आणि अजूनही त्यांना भूमिका मिळत आहेत. 1960 च्या दशकापासून रंगभूमीवर पदार्पण करणारा हा अभिनेता अद्याप नाटकांत काम करत आहे. विनोदी, गंभीर असे सर्व प्रकारचे चित्रपट आणि विविध प्रकारच्या भूमिका करणारा हा अभिनेता नवीन काळाशी सांधा जोडत राहिला आहे. खर्‍या आयुष्यात अत्यंत गंभीर स्वभावाचा, नाती जपणारा आणि कमालीचा संवेदनशील असा हा माणूस. या बहुरंगी आणि बहुरूपी अभिनेत्याचा बर्‍याच उशिरा, पण उचित गौरव झाला आहे.

Back to top button