मनोज जरांगे… कोर्टात भेटू; दूध का दूध, पानी का पानी करू : लक्ष्मण हाके | पुढारी

मनोज जरांगे... कोर्टात भेटू; दूध का दूध, पानी का पानी करू : लक्ष्मण हाके

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा अध्यादेश नुकताच काढला. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावर ओबीसीमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मात्र मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खुले आव्हान दिले असून, ’मनोज जरांगे… कोर्टात भेटू, दूध का दूध, पानी का पानी करू…’ असे आव्हान त्यांनी दिले आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयावर न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ओबीसी समाजाकडून सुरू आहे. मात्र, आता या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जरांगे पाटील यांची औकात काढली आहे. तसेच ’मनोज जरांगे… कोर्टात भेटू, दूध का दूध, पानी का पानी करू,’ असे थेट आव्हान दिले आहे.

याबाबत हाके यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मंगळवारी (दि. 30) व्हायरल केला आहे. ओबीसी नेते कोर्टात गेले तर आपण मंडल आयोगाला चॅलेंज करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, एकीकडे ओबीसीतून आरक्षण मागायचे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करायचे, अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील तुझी औकात काय आहे? डुप्लिकेटपणा करून ओबीसीत तुम्ही घुसखोरी केली आहे. मनोज जरांगे कोर्टात अवश्य भेटू, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

ओबीसींचा हक्क हिरावला
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना कोर्टात नक्की भेटू, असे आव्हान दिले. तसेच ओबीसींचा हक्क हिरावल्याचे त्यांनी म्हटले आहे. जरांगे तुला तुझ्या लेकराबाळांचे पडलेले नाही तर तुला गोरगरीब ओबीसींचा हक्क हिरावून घ्यायचा आहे. सरकारवर दबाव आणून आरक्षण मिळाले. परंतु, ते कोर्टात टिकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानिक पदावर राहून पदाचा गैरवापर केला आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. त्यामुळे आता कोर्टात नक्की भेटू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button