चौकातील स्मरणशिल्प काढण्यास विरोध; आजी माजी आमदारांकडून मनाई | पुढारी

चौकातील स्मरणशिल्प काढण्यास विरोध; आजी माजी आमदारांकडून मनाई

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे चौकातील मालोजीराजे यांचे स्मरणशिल्प बाह्यवळण विस्ताराच्या कामात पाडले जाणार आहे. याविरोधात शिवप्रेमींनी एकजुट दाखवल्यानंतर रविवारी (दि.21 ) आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी भेट देत शिल्पाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना केल्या. आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहराच्या वैभवात भर घालावी आणि इतिहासाच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत शहरातील पुणे बाजूकडून येणार्‍या बाह्यवळण मार्गावर वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे शिल्प उभा केले. याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व आ. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

त्या चौकाला वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे नाव देण्यात आले. हा चौक इंदापूर शहरवासीयांसह पुणे- सोलापूर मार्गावरून येणार्‍या जाणार्‍यांसाठी सेल्फी पॉईंट बनला होता. मात्र, बाह्यवळण मार्गाच्या विस्तारीकरणात उड्डाणपूल निर्माण करण्यासाठी हे शिल्प पाडण्यास सुरवात केली होती. याची कुणकुण लागताच शिवप्रेमींनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. याची दखल घेत आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर यांनी या स्थळाला भेट दिली तसेच ठोस निर्णय होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना केल्या. तर हर्षवर्धन पाटील यांनीही शिवप्रेमींच्या मागणीचा आदर करीत शिल्पाचे पाडलेले काम पुन्हा करण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकार्‍यांबरोबर बैठक घेणार : आ. भरणे

आमदार भरणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि या प्रश्नासाठी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंपनीचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व शिवप्रेमी यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत सकारात्मक तोडगा काढावा तसेच इंदापूरच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या वीरश्री मालोजीराजे यांच्या शिल्पाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली. यासाठी जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिल्पाची तत्काळ दुरुस्ती करा : हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना मालोजीराजे शिल्पाची झालेली तोडफोड तात्काळ थांबवावी. तसेच शिल्प पुन्हा जैसे थे करून द्यावे अशी सूचना केली.

हेही वाचा

Back to top button