कोल्हापूरमधील शाहूपुरीत चौथ्या गल्लीतील राम मंदिराला 100 वर्षांची परंपरा आहे. 1922 साली सरदार घराण्यातील दत्ताजीराव दिनकरराव थोरात आणि कुटुंबाने आपल्या खासगी मिळकतीत या मंदिराची स्थापना केली. 1945 पर्यंत हे खासगी मंदिर होते. दत्ताजीराव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गौराबाई यांनी एक मृत्युपत्र तयार करून, त्याद्वारे संपूर्ण दहा हजार स्क्वेअर फूट जागा मंदिरासाठी दिली. तसेच मंदिराच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्तांची नेमणूक केली. त्यांच्या दोन मुलांचा अकाली मृत्यू झाला, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आले.
याठिकाणी राम मंदिर झाल्यानंतर थोरात घराण्याचे घरातील जोतिबा, नाईकबा, तुळजाभवानी हे देव होते. ट्रस्ट तयार झाल्यानंतर ही संपूर्ण मिळकत श्रीराम मंदिर कोल्हापूर या ट्रस्टच्या नावे करण्यात आली. 2007 साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला. यावेळी राजस्थानवरून संगमरवरी मूर्ती आणून स्थापित करण्यात आल्या.
शंकरराव चव्हाण हे पुजारी म्हणून काम बघत होते. नारायणराव साळोखे, दिनकरराव शिंदे, ज्ञानदेव जोती सासने हे सुरुवातीचे विश्वस्त होते. यशवंतराव गणपतराव साळोखे, भाऊसाो सावंत, शिवकुमार चव्हाण हे सध्याचे विश्वस्त असून; कुलदीप भोसले यांची पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शामराव शिंदे या विश्वस्तांचे निधन झाले आहे. शंकरराव चव्हाण यांनी अनेक वर्षे या मंदिरात सेवा केली. त्यांच्या तिसर्या पिढीतील शिवकुमार या मंदिराची व्यवस्था पाहतात.
या मंदिरात रामनवमीला मोठा उत्सव होतो. यावेळी 7 हजार लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दर महिन्याच्या शेवटच्या एकादशीला श्रीधर सुतार यांच्यासह वाद्यवृंदाचा भजनाचा कार्यक्रम होतो. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने या मंदिरात मोठा उत्सव नियोजित आहे. उत्तर भारतीय समाजाच्यावतीने त्यादिवशी सकाळी 7 ते 10 या वेळेत 'रामायणा'तील सुंदरकांड हा कार्यक्रम होणार आहे.