ठाकरे गटाचे बडे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर | पुढारी

ठाकरे गटाचे बडे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर

दिलीप सपाटे

मुंबई : कोरोना काळातील कथित खिचडी गैरव्यवहारप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या प्रमुख नेत्यांभोवती चौकशीचा फास आवळला जाणार असल्याचे संकेत आहेत.
कोरोना काळात 300 ग्रॅम खिचडी वाटपाचे कंत्राट असताना फक्त 100 ग्रॅम खिचडी वाटप करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा इशारा हिवाळी अधिवेशनात दिला होता. त्यानंतर लगेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली.

भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या आणि भावाच्या खात्यावर या खिचडी घोटाळ्याचे पैसे गेल्याचा आरोप केला आहे. येत्या 15 दिवसांत राऊत कुटुंबातील सदस्य तुरुंगात असतील, असा दावाही नितेश राणे यांनी केल्याने खिचडी घोटाळ्याच्या चौकशीची व्याप्ती वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता या आठवड्यात एकाचवेळी आमदार राजन साळवी, रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना तपास यंत्रणांनी समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितल्याने या नेत्यांच्या भोवतीही चौकशीचा फास आवळला जाण्याचे संकेत आहेत.

शिवसेना उद्धव गटाचे आमदार राजन साळवी यांची सोमवारी 22 जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर तसेच मातोश्री क्लबसह चार ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. जोगेश्वरी भूखंड प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता. 500 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी पेडणेकर यांना 25 जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button