..तर मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू : आदित्य ठाकरे यांची टीका | पुढारी

..तर मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू : आदित्य ठाकरे यांची टीका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री आमचे ऐकत नाही, राज्याचेही ऐकत नाहीत, महाराष्ट्राचा ऐकत नाहीत, ते फक्त गुजरातचे ऐकतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपले सरकार नक्की बसणार. ज्या अधिकार्‍यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटले त्या सर्वांना जेलमध्ये टाकू, असा थेट इशाराच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
युवासेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित ‘युवा खेळ समिट’ महोत्सवाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.

त्यानंतर मैदानाबाहेर कर्मवीर भाऊराव पाटील चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर व चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप राममंदिराचा मुद्दा विसरून गेली होती, त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरील मूठभर माती अयोध्येत नेऊन ‘पहिले मंदिर फिर सरकार’ हा निर्धार केला होता. ‘रघुकुल रीत’ प्रमाणे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. कोरोना संकटकाळात खरी आकडेवारी दाखवली.

आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो. बलात्कार्‍यांना फासावर लटकवले जाते. भाजपच्या हिंदुत्वात पॅरोलवरील बलात्कार्‍यांचा सत्कार केला जातो. अर्थमंत्री फंड देत नाहीत, अशी तक्रार शिंदे गटाचे आमदार करत होते. आता अर्थमंत्री कोण आहेत, हे चाळीस गद्दारांनी सांगावे. भाजपकडे असणारे पालकमंत्रिपद आता कोणाकडे आहे, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. महाविकास आघाडीने प्रस्तावित केलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ रद्द करण्यात आले. लोहगाव विमानतळाची नवीन इमारत चार महिन्यांपासून बांधून तयार असूनही, खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दावोसमधून राज्यासाठी काय आणले?

गुजरातला वर्ल्ड कप नेला आणि आपण हरलो. जर तुम्ही वानखेडेवर अंतिम सामना खेळवला असता तर आपण जिंकलो असतो. मागच्या वर्षी 2 दिवसांत दावोसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झाले. आता 50 लोक घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांना 50 हा आकडा खूपच आवडतो, असा टोला लगावतानाच दावोसमध्ये जाऊन त्यांनी मज्जा केली. तुम्ही राज्यासाठी काय आणले ते सांगा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले.

हेही वाचा

Back to top button