क्लिकवर मिळणार भूमिअभिलेख : महाभूमी संकेतस्थळावरून अंमलबजावणी | पुढारी

क्लिकवर मिळणार भूमिअभिलेख : महाभूमी संकेतस्थळावरून अंमलबजावणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना विविध जमिनी अगर इतर कामासाठी जुन्या अभिलेखांंची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने घरबसल्या नागरिकांना जमिनीसंबंधित जुने अभिलेख उपलब्ध करून दिले आहेत. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली असून, भूमिअभिलेख विभागाच्या ‘महाभूमी’ या संकेतस्थळावर गेल्यास हे अभिलेख उपलब्ध करून दिले आहेत.

नागरिक लाखो रुपये मोजून जमीन खरेदी करतात. खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक वेळा कोर्ट- कचेर्‍यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी मूळ जमीन कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे, अभिलेख मिळवावे लागतात. मात्र, ते नागरिकांना मिळतीलच याची कोणतीही शाश्वती शासनाच्या वतीने देण्यात येत नाही.

राज्यातील मुंबई शहर वगळता उर्वरित 35 जिल्ह्यातील सर्व तहसिल, भूमी अभिलेख व नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 22 जिल्ह्यातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग पूर्ण करण्यात येऊन ते संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपासून राज्यातील 22 जिल्ह्यांचे डिजिटली साक्षांकित झालेले अभिलेख महाभूमीच्या संकेतस्थळावर सशुल्क उपलब्ध करून दिलेले आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

– सरिता नरके, प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त.

22 जिल्ह्यांचे स्कॅन पूर्ण

अपलोड करण्यात आलेल्या जुन्या अभिलेखांमध्ये 7/12, जुनी फेरफार नोंदवही ,चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही, या अभिलेखांच्या असांक्षाकित अभिलेख केवळ पाहण्यासाठी संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती भूमिअभिलेख विभागाच्या प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी दिली. 22 जिल्ह्यांचे स्कॅन झालेले साक्षांकित अभिलेख संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हेही वाचा

Back to top button