दहावी-बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाइन नोंदविणार | पुढारी

दहावी-बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण ऑनलाइन नोंदविणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण तत्काळ नोंदविले जावेत, यासाठी राज्य मंडळाने एक ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेले गुण पडताळणी करून तत्काळ ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदविले जाणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना मिळालेले गुण संबंधित शिक्षकांना राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवावे लागणार आहेत. यासाठी राज्य मंडळाने स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये शिक्षक, बाह्यशिक्षक/परीक्षक आणि संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्य यांना विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षांमधील गुण ऑनलाउन पद्धतीने नोंदविता येणार आहेत.

दहावी-बारावीमध्ये प्रवेशित अनेक विद्यार्थी खासगी क्लासशी टाय-अप असणार्‍या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे दहावी-बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहेत.

प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान ’ओएमआर शीट’ स्कॅन करून विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यात येत होते. परंतु, यंदापासून मेकर आणि चेकर पध्दत अमलात आणली आहे. यामध्ये शिक्षकाने दिलेले गुण मुख्याध्यापकाने तपासायचे आहेत आणि ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदवायचे आहेत. एकदा गुण ऑनलाइन नोंदविले की त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांना दिलेल्या गुणांची एक प्रत शाळेत आणि एक प्रत विभागीय कार्यालयात जमा करायची आहे. या प्रणालीमुळे प्रात्यक्षिकांचे गुण नोंदविण्याच्या प्रक्रियेतील वेळही वाचणार आहे.

– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

हेही वाचा

Back to top button