प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले रामटेक

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले रामटेक

नागपूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने एकदा नव्हे दोनदा पावन झाल्याचे दाखले आहेत. एकदा राम 14 वर्षे वनवासात असताना याच दंडकारण्यातूनच पुढे नाशिककडे मार्गस्थ झाले. दुसर्‍यांदा प्रभू रामचंद्र राज्याभिषेकानंतर शंभूक वधाच्या निमित्ताने आल्याचे सांगितले जाते.

श्रीक्षेत्र रामटेकमध्ये रामाचे ऐतिहासिक गडमंदिर आहे. राम काही काळ या ठिकाणी वास्तव्यास होते. सातपुडा पर्वतराजींच्या शेवटच्या डोंगरावर हे गड मंदिर आहे. प्रभू श्री रामाने जिथे विश्रांती घेतली तेच हे रामटेक, म्हणूनच त्याला रामटेक असे नाव पडल्याचे सांगितले जाते. येथे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. पौराणिक संदर्भ, हिंदू धर्मानुसार अगस्त्य ऋषींचा आश्रम रामटेकच्याच अर्थात रामगिरी पर्वताजवळ जवळ होता. यालाच पुढे सिंदुरागिरी पर्वत अशीही ओळख मिळाली. सध्याचे मंदिर 18 व्या शतकात नागपूरचे मराठा शासक श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी छिंदवाडा येथील देवगड किल्ला (गोंड राजवटीत राजधानी) जिंकल्यानंतर बांधले. भोसले कुटुंबाकडेच व्यवस्थापन होते. संस्कृत कवी कालिदासाने याच रामटेकच्या डोंगरातच मेघदूत लिहिले. रामटेक हे एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र. सातपुडा पर्वतरांगेतील अंबागड नावाने ओळखल्या जाणार्‍या पश्चिमेकडील टेकडीच्या शेवटच्या टोकावर वसले आहे. या पर्वताचे प्राचीन नाव सिद्रागिरी, तपांगिरी असेही होते, असे श्री लक्ष्मण मंदिराच्या सभा मंडपातील दर्शनी भागात कोरलेल्या इ.स. 13-14 व्या शतकातील यादव नृपतीच्या शिलालेखात आढळून येते.

लक्ष्मणाची आज्ञा किंबहुना दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला प्रभू राम आणि सीतामाई अर्थात जानकीचे दर्शन होत नाही. शेजारी स्वतंत्रपणे हनुमंतरायाचे मंदिर आहे. अशी रचना देशात केवळ रामटेकलाच असल्याचे दिसते. गडमंदिरावर राम-सीता व लक्ष्मण यांचे शिवाय ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिर, वराह मंदिर, केवल नृसिंह, रुद्र नृसिंह, भोगराम, गुप्तराम यांचीही मंदिरे आहेत. गडाच्या पायथ्याशी अंबाळे (अंबाळा) नावाचा निसर्गरम्य तलाव आहे.

कसे पडले रामटेक हे नाव?

खरे सांगायचे तर रामटेक या नावाचाही इतिहास आहे. वनवासात रामाने याच परिसरात पाठ टेकून विश्रांती घेतली म्हणून या क्षेत्रात रामटेक असे नाव पडल्याचे सांगितले जाते. दुसरे म्हणजे, अवधी भाषेत 'टेक' म्हणजे 'प्रतिज्ञा' होते. अगस्त मुनी येथे वास्तव्यास असताना राक्षसांनी धुमाकूळ घातला. साधू, संतांची हत्या केली जात होती. वनवासात असताना श्रीराम अगस्ती मुनींच्या आश्रमात आल्यावर त्यांना हा वृत्तांत समजला. प्रभू श्रीरामचंद्रांनी जोपर्यंत या राक्षसांचा नायनाट करणार नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली आणि राक्षसांचा नायनाट केला. या रणकंदनात पर्वत रक्ताने लाल झाला. म्हणून या पर्वताला सिंदुरागिरी हे नाव पडले आणि श्रीरामामुळे 'रामटेक' हे नाव अजरामर झाले. वनवासात असताना दुपारच्या वामकुक्षीसाठी प्रभू श्रीराम निसर्गरम्य असलेल्या एका टेकडीवर (टोला) थांबले. या ठिकाणच्या गुफेतूनच प्रभू श्रीरामचंद्र रामटेककडे मार्गस्थ झाले. म्हणून देवलापारपासून एक किलोमीटर अंतरावरील हा टोला 'रामटेकडी' नावाने ओळखला जातो. हजारो भाविक या ठिकाणी राम मंदिरात नतमस्तक होण्यासाठी येतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news