आमदार दत्तात्रय भरणेंनी जाणल्या प्रवाशांच्या समस्या | पुढारी

आमदार दत्तात्रय भरणेंनी जाणल्या प्रवाशांच्या समस्या

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : निमगाव केतकीतून इंदापूरला जाण्यासाठी एस. टी. बसच्या अपुर्‍या सुविधांमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर एस. टी. आगारप्रमुखांना सूचना दिल्यानंतर निमगाव केतकी येथील विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र जादा गाड्या सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. आमदार भरणे यांनी निमगाव केतकीहून इंदापूरपर्यंत विद्यार्थ्यांसमवेत एस. टी. बसने प्रवास केला.

निमगाव केतकी व परिसरातून इंदापूरला महाविद्यालयाला जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 300 असून, सकाळी गाड्या वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे पहिले दोन, तीन तास बुडत होते. यासंदर्भात दै. ’पुढारी’नेही विद्यार्थ्यांच्या समस्येच्या सतत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
आ. भरणे यांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता निमगाव केतकी बसस्थानकावर प्रत्यक्ष येऊन इंदापूरला जाणार्‍या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपल्या हक्कासाठी विद्यार्थ्यांना भांडता आले पाहिजे.

या वेळी उपस्थित असलेले आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांना सूचना देताना भरणे म्हणाले की, यापुढे सहलीसाठी अथवा लग्नासाठी गाड्या गेल्या, तरी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका तसेच तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची एस. टी.ची गैरसोय होणार नाही असे नियोजन करा. या वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते भरणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील पालकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button