कोल्हापूर : थेट पाईपलाईनला मांगोली येथे मोठी गळती | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईनला मांगोली येथे मोठी गळती

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईनला मांगोली (ता. राधानगरी) मुख्य रस्त्यानजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली. सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी किमान १० फूट उंच उडत असल्याचे दिसले. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका मोठा होता की, वरील व्हॉल्व बाजूला फेकला गेला होता.

काळम्मावाडी-कोल्हापूर थेट पाईपलाईन कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. वारंवार पाईपलाईनची गळती सुरूच आहे. आज सकाळी मांगोली येथे उच्च दाबामुळे पाईपलाईनला बसविलेला चक्क व्हॉल्व उडून पाण्याची मोठी गळती सुरु झाली. पाण्याचा दाब इतका मोठा होता की, जवळपास दहा फुट पाणी वरती उडत होते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकाचे व बांधाचे प्रचंड नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहाने शेजारील शेतांना तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते. गळती लागली की संपर्क करायचा तर कोणाशी यासाठी पाईपलाईन मार्गावरती ठराविक अंतरावर पाईपलाईन संदर्भात एखादी घटना घडल्यास संपर्कासाठी संपर्क पाट्या लावणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक लोकांचे आहे.

पाणी जातयं कोल्हापूरला, शेतकरी सोडला वाऱ्याला

काही दिवसांपूर्वी अर्जुनवाडा, तुरंबे, ठिकपूर्ली या ठिकाणी अशाच पद्धतीची गळती लागली होती. त्याचे काय झाले? आज आमच्या शेताच्या शेजारी गळती लागली संरक्षणासाठी घातलेला बांध फुटला, याचे नुकसान कोण देणार? ‘पाणी जातय कोल्हापूरला अन् शेतकरी सोडला वाऱ्याला’ अशी परिस्थिती निर्माण झालेली असल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button