महत्वाची बातमी : बारावीचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार | पुढारी

महत्वाची बातमी : बारावीचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये घेतल्या जाणार्‍या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने येत्या 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू शकतात. हॉल तिकीटसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळातर्फे देण्यात आले आहेत.

राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी/ मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. ओक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

हॉल तिकीटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉल तिकिटामध्ये बदल असेल किंवा हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक संबंधित शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा हॉल तिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button