जळगावात सर्वात कमी तापमान; आगामी पाच दिवस राज्यात थंडीचा जोर | पुढारी

जळगावात सर्वात कमी तापमान; आगामी पाच दिवस राज्यात थंडीचा जोर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली असून, किमान तापमानाचा पारा सातत्याने घटत चालला आहे. बुधवारी जळगावमध्ये राज्यात सर्वात कमी म्हणजे 9.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून तीव्र थंडीची लाट आली आहे. विशेषत:, दिल्ली, बिहार, पंजाब, राजस्थान, झारखंड या राज्यांसह ईशान्य भारतातील राज्यांतदेखील जोरदार थंडी आहे.

काही भागांत पारा 2 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. शिवाय, दाट धुके पसरले आहे. या भागांकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. परिणामी, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांत थंडीची लाट सुरू आहे. बहुतांश राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण वगळता उर्वरित भागांत जोरदार थंडी सुरू आहे. पुढील पाच दिवस थंडीची लाट सुरूच राहील.

हेही वाचा

Back to top button