Pune Drugs Case : मुक्काम वाढविण्यासाठीच ललितच्या उपचाराला विलंब | पुढारी

Pune Drugs Case : मुक्काम वाढविण्यासाठीच ललितच्या उपचाराला विलंब

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थतस्कर ललित पाटील उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयात दाखल झाला होता. पाटील याच्यावर ससूनमधील कैद्यांच्या कक्षात उपचार सुरू होते. पाटीलवरच्या उपचाराची जबाबदारी ससूनचे माजी आधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पाटीलवर उपचार करताना विलंब करण्यात आल्याचे डॉ. ठाकूर यांच्या चौकशीतून समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाटील ससूनमधील कैदी उपचार वॉड क्रमांक 16 मधून साथीदारांच्या मदतीने अमली पदार्थांची विक्री करत होता. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी ससूनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापळा लावून ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी 32 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी ललितच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली, यामागचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ललित ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलिस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचार्‍यासह 20 जणांना अटक करण्यात
आली आहे.

हेही वाचा

Back to top button