मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती | पुढारी

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सहा हजार 353 प्रगणक आणि 438 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रगणक, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी निकष निश्चित केले आहेत.

आयोगाने 154 प्रश्नांची सूची तयार केली असून, या प्रश्नावलीनुसार प्रत्येक घरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडून संगणकप्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षणामध्ये मिळालेली माहिती संगणकप्रणालीमध्ये संकलित केली जाणार आहे. घरोघरी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 13 तालुक्यांमध्ये तसेच पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयामधील गावांमध्ये प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

त्यानुसार सहा हजार 353 प्रगणक नेमले आहेत. प्रत्येक प्रगणकाकडे 150 ते 200 घरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रगणकांसोबत समन्वय ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. 15 प्रगणकांच्या गटाला एक पर्यवेक्षक असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 438 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, नगरपालिका क्षेत्रासाठी 578 प्रगणक तर सुमारे 35 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

पर्यवेक्षक आणि प्रगणकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरोघरी सर्वेक्षणासंदर्भात निर्देश दिले जातील. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात सर्वेक्षण केले जाणार आहे.

– ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.

हेही वाचा

Back to top button