अभिमानास्पद : देशातील 80 विमानतळांना पुणे वेधशाळा करते मार्गदर्शन | पुढारी

अभिमानास्पद : देशातील 80 विमानतळांना पुणे वेधशाळा करते मार्गदर्शन

पुणे : देशातील 80 विमानतळांना पुणे हवामान विभाग खराब हवामानाबाबतचे अलर्ट देते. देशातील विमानतळावरची हवामान यंत्रणा पुणे आयएमडीच्या मार्गदर्शनाखाली चालते, याची माहिती याठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शनात दाखवली गेली. पुणे वेधशाळेच्या प्रांगणात सोमवारी अद्ययावत हवामानयंत्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात सर्वांत लक्षवेधी स्टॉल होता विमानतळावरच्या हवामानाच्या अलर्ट सिस्टिमचा. देशातील 80 विमानतळांना पुणे वेधशाळा अडचणीच्या वेळी सतत मार्गदर्शन करीत असते. यात खराब हवामानाचे अपडेट दिले जातात. अधिकार्‍यांनी सांगितले की, एव्हिएशन वेदर या प्रकारात ही माहिती दिली.

एव्हीएशन वेदर नावाची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यात पुणे वेधशाळा मार्गदर्शन करते. हाताने लिहिण्यापासून ते आता एआय तंत्रज्ञानापर्यंतची स्थित्यंतरे भारतीय हवामान विभागाने 150 वर्षांत पाहिली आहेत. एआयचा वापर होण्यास अजून 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागणार आहे.

-अनुपम कश्यपी, हवामान विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा

विमानतळाच्या धावपट्टीच्या बाजूला असते केंद्र

देशातील 80 विमानतळांवर स्वतंत्र हवामान केंद्रे आहेतच, ते इमारतीच्यावर किंवा बाजूला असतात. आणखी एक छोटीशी यंत्रणा धावपट्टीच्या बाजूला असते. ते स्वयंचलित हवामान केंद्र असते. यात दोन कॅमेरे, एक सेन्सर, मॉनिटर आणि दोन डिजिटल मीटर अशी छोटीशी यंत्रणा असते. त्या मॉनिटरवर हवेचा दाब, दृश्यमानता वार्‍याचा वेग या महत्त्वाच्या बाबी सतत दिसत असतात. यावरून विमानतळावरील स्थानिक हवामान विभागाचे अधिकारी सावधानतेचे अलर्ट देतातच; मात्र मोठी अडचण आली तर पुणे वेधशाळेशी संपर्क केला जातो. कारण, या सर्व यंत्रणेचे रिपोर्टिंग पुणे वेधशाळेकडे आहे.

लग्नघराप्रमाणे सजली होती वेधशाळा

भारतीय हवामान विभागाचा सोमवारी 150 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पुणे वेधशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हवामान साहित्याचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले सुमारे 150 कर्मचार्‍यांना निमंत्रण दिले होते. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. इंग्रजांच्या काळात बांधलेली ही वेधशाळा लग्नघराप्रमाणे सजली होती. विद्युतरोषणाईसह फुगे लावलेले होते. प्रत्येक दालन उघडून तेथे त्या विभागाची माहिती व काम काय होते, याची माहिती देणारे स्टँडी लावले होते.

हेही वाचा

Back to top button