महत्वाची बातमी : पुन्हा भरता येणार शिक्षक भरतीसाठी स्वप्रमाणपत्र; आज अखेरची संधी | पुढारी

महत्वाची बातमी : पुन्हा भरता येणार शिक्षक भरतीसाठी स्वप्रमाणपत्र; आज अखेरची संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण न केलेल्या उमेदवारांना आता पुन्हा एकदा स्वप्रमाणपत्र भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्राकरिता नोंदणी करण्यासाठी मंगळवार (दि. 16 जानेवारी) पर्यंत मुदत राहील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची आज अखेरची संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाजीनगरमधील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे उमेदवारांनी केलेल्या याचिकांतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकार्‍यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्व-प्रमाणन करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर केला होता, दरम्यानच्या कालावधीत उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरमध्ये अवमान याचिका व संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत. या अवमान याचिकेमध्ये दिनांक 12 जानेवारीला सुनावणी झाली. त्यानुसार शासन पत्र दिनांक 12 जानेवरी 2024 अन्वये याचिकेतील उमेदवारांना चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा बीएड ही अर्हता धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button