Pune News : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरच.. | पुढारी

Pune News : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरच..

शिवाजी शिंदे

पुणे : शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक आणि तुळापूर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याला राज्य सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिल्यानंतर वर्षभरापासून रखडलेले हे काम आता लवकरच सुरू होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्मारकासाठी 384 कोटी रुपयांचा आराखडा 2022 मध्ये मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विकास आराखड्याबाबत समिती नेमण्यात आली आहे. जिल्हा नियोजन वार्षिक योजनेंतर्गत 269 कोटी 34 लाख रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला. त्यानुसार, निविदा काढून त्याला मंजुरी देण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी साधर्म्य सांगणारे हेरिटेज टच असलेले जागतिक दर्जाचे ऐतिहासिक स्मारक तुळापूर येथे उभारण्यात येणार आहे. वढू येथील समाधी स्थळाला जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ बनविण्यासाठी त्या परिसरात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वढू बुद्रूक गावाचे मुख्य प्रवेशद्वार ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा वाटतील, असे उभारण्यात येईल.

इतिहासकाळास अनुरूप दगडी बांधकाम, इतिहासाची साक्ष देणार्‍या समाधी स्थळाच्या भिंती व बुरुज, बहुद्देशीय सभागृह, भक्त निवास, समाधी स्थळाच्या मागील बाजूस ऐतिहासिक चित्रे अशा पद्धतीचा आराखडा करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, नाले आणि जलस्रोतांची सुधारणा, पूल आणि बंधार्‍यांचा विकास, नदीवर घाट बांधणे, प्रदर्शनातून बारा बलुतेदार (गावगाडा) ग्रामीण संस्कृती मांडणे आदी कामे आराखड्यामध्ये प्रस्तावित केली आहेत.

आणखी 264 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 269 कोटी 34 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी 264 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वढू बुद्रूक आणि तुळापूर येथील स्मारक आराखड्यासंदर्भात डिसेंबरमध्ये बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने एक जानेवारीला काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. हे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

वढू ब्रुद्रूक येथील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि तुळापूर येथील स्मारक याबाबतच्या विकास आराखड्याचे काम लवकरच सुरू होत आहे. ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

– बप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

हेही वाचा

Back to top button