शहरातही महास्वच्छता अभियान राबवा : मुख्यमंत्र्यांची महापालिकेला सूचना | पुढारी

शहरातही महास्वच्छता अभियान राबवा : मुख्यमंत्र्यांची महापालिकेला सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे व मुंबईप्रमाणेच पुणे शहरातही महास्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार शहराचीही सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) केली जाणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग मोहीम आणि महिला सशक्तीकरण अभियान यांच्याविषयीची आढावा बैठक मुंबईतील शासकीय निवासस्थानी घेतली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांच्यासह पालिकेच्या सर्व विभागांचे उपायुक्त या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीविषयी माहिती देताना डॉ. खेमनार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पुण्यातही डीप क्लिनिंग मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार शहरातील धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रांच्या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जाईल. याशिवाय शहरातील आदर्श रस्ते योजनेत निवडण्यात आलेले प्रमुख 15 रस्ते, महत्त्वाचे चौक या ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबवली जाईल. रस्ते, पदपथ, दुभाजक पाण्याच्या उच्च दाबाच्या फवार्‍याने धुतले जातील. रस्त्यावरील कचरा, माती हटविण्यात येईल. अनधिकृत फलक, होर्डिंग काढले जातील, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button