प्रक्षाळपूजनाने संत सोपानदेव समाधी सोहळ्याची सांगता | पुढारी

प्रक्षाळपूजनाने संत सोपानदेव समाधी सोहळ्याची सांगता

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  संत श्रीसोपानकाका समाधी उत्सवाची सांगता गुरुवारी (दि. 11) प्रक्षाळपूजने झाली. गुरुवारी सकाळी काकड आरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी मंदिर व परिसर धुवून घेतला. त्यानंतर श्रींना पवमान अभिषेक करण्यात आला. सकाळी चांबळी (ता. पुरंदर) येथील हभप म्हस्कु महाराज कामठे यांची कीर्तन सेवा झाली. त्यानंतर 11 वाजता श्रींना लिंबू, साखर व गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. या वेळी ग्रामस्थांची देवास गरम पाणी घालण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री पुणे येथील हभप संदीप महाराज पळसे यांची काल्याची कीर्तनसेवा झाली. त्यानंतर श्रींना काढ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. श्रींना काढ्याचा नैवेद्य दाखवून उपस्थित भाविकांना काढा वाटण्यात आला. दुधामध्ये लवंग, इलायची, सुंठ, साखर आदी पदार्थ घालून हा काढा बनविण्यात येतो, अशी माहिती संत सोपानदेव मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अ‍ॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.

संबंधित बातम्या :

उत्सव सोहळ्यात आलेल्या मुक्कामी दिंड्या, पताका, टाळ-मृदंग, हरिनामाचा जयघोष आणि भाविक-भक्तांची झुंबड यामुळे देऊळवाडा भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. दरम्यान, बुधवारी (दि. 10) काल्याचे कीर्तन झाले. चिंचेच्या झाडाखाली टाळ-मृदंगाच्या निनादात व जयघोषात दहीहंडी रंगली. या वेळी वारकरी, भक्तांचा मोठा उत्साह दिसून आला. त्यानंतर दिंडी प्रदक्षिणा रंगली. सायंकाळी संत सोपानदेव देवस्थानतर्फे प्रवचन झाले. नंतर महिन्याच्या वारकर्‍यांचे भजन व हरिपाठ झाला. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत हभप रोकडोबादादा दिंडीचा जागर झाला. शेवटी प्रक्षाळ पूजा, प्रवचन, हरिपाठ, पुन्हा कीर्तन होत आठ दिवस रंगलेल्या भक्तिमय यात्रेची सांगता झाली, अशी माहिती संत सोपानदेव मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अ‍ॅड. गोसावी यांनी दिली.
कोल्हापूर येथील सद्गुरू विश्वनाथ रूकडीकर ट्रस्टतर्फे संत सोपानदेव यात्रेनिमित्त मंदिरामध्ये मोफत आयुर्वेदिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button