निकालाचे इंग्रजीमध्ये वाचन करणे दुर्दैवी : जयंत पाटील | पुढारी

निकालाचे इंग्रजीमध्ये वाचन करणे दुर्दैवी : जयंत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठी जनतेसाठी महत्त्वाचा असणारा, मराठी जनसामान्यांवर प्रभाव पाडणारा आणि मराठीसाठी कायम आग्रह धरणार्‍या पक्षासंदर्भातील निकालाचे वाचन महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी इंग्रजीमध्ये वाचणे, हे दुर्दैवी असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केली. शिरुर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पुणे शहर राष्ट्रवादी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर आयेजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेमहबुब शेख, आमदार अशोक पवार, माजी आमदार जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अश्विनी कदम उपस्थित होते. पाटील म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणे टाळले असते, तर बरं झाले असते.

त्यांनी निकालाअगोदर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांनी दिलेल्या निकालाबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल खेड्यापाड्यातील जनसामांन्यांना कळू नये, म्हणून तो विधानसभा अध्यक्षांनी इंग्रजीत वाचला, असे म्हटले तर चुकीचे ठकणार नाही. ते निकाल मराठीमध्ये वाचून न्यायालयाकडे पाठवता तो इंग्रजी करू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही, असेही पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना प्रतोद म्हणून सुनील प्रभु यांना मान्यता देत भरत गोगावले यांची निवड बेकायदा ठरवली होती. मात्र नार्वेकरांनी न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेत गोगावले यांना अधिकृत ठरवले. या विरोधात उद्धव ठाकरे न्यायालयात दाद मागू शकतात. राष्ट्रवादीच्या बाबतील नार्वेकर दोन्ही बाजू ऐकूण निर्णय घेतील.

त्यांच्या निर्णयानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू. ज्या ठिकाणी आमचे पदाधिकारी नाहीत, तेथे नवीन पदाधिकारी नियुक्त करून आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भात दिल्लीत चर्चा होऊन जागावाटप झाल्यानंतर तत्काळ आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. उमेदवार ठरवताना निवडून येण्याचा निकष ठेवला जाईल. पुण्याच्या जागेबाबतीत काँग्रेस व मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल असेही पाटील म्हणाले. ते जेवढे पवार साहेबांच्या वयाची आठवण करून देतील, तेवढी साहेबांची लोकप्रियता व पाठींबा वाढणार असल्याची टीकाही पाटील यांनी अजित पवारांवर नाव न घेता केली.

हेही वाचा

Back to top button