शरद मोहोळच्या खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत | पुढारी

शरद मोहोळच्या खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत

कराड; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात झालेल्या गुंड शरद मोहोळ याच्या खुनात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मोहोळवर प्राणघातक हल्ला करणार्‍यांमध्ये धनंजय वाटकर या कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी, धनंजय वाटकर याने गुंड शरद मोहोळच्या खुनासाठी पिस्तुल पुरवल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर कराडात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे गतवर्षी मार्च महिन्यात 14 पिस्तूलसह दहाजणांना अटक झाली होती. यात वाटकरचा सहभाग होता. त्यावेळी कराड पोलिसांनी त्याला अटकही केली होती. मागील काही महिन्यांपासून वाटकरचा सातत्याने पुणे परिसरात वावर असल्याचे बोलले जात आहे. आता शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भरदिवसा गोळ्या झाडून खून झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास पथके विविध भागात रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली होती. या गुन्ह्यात दोन वकिलांनाही अटक झाली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामध्ये गोळीबारासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले. त्यातून पुणे पोलिसांनी धनंजय वाटकर याला ताब्यात घेतले आहे. कराड शहर व परिसरातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारांचे लागेबंधे

सन 2009 पासून कराड शहरासह तालुक्यात बेकायदा शस्त्र तस्करीचा भस्मासुर किती घातक ठरू शकतो? हे अनेकदा पाहावयास मिळाले आहे. कराड शहरासह जिल्ह्यात पोलिस अनेकदा कारवाई करून बेकायदा शस्त्रे हस्तगत करतात. मात्र त्यानंतरही बेकायदा शस्त्र तस्करी सुरूच असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

Back to top button