कौतुकास्पद ! स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची 20 व्यावरुन 10 व्या स्थानावर झेप | पुढारी

कौतुकास्पद ! स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची 20 व्यावरुन 10 व्या स्थानावर झेप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ स्पर्धेत पुणे शहराने गतवर्षीच्या 20 व्या क्रमांकावरून कामगिरी उंचावत एक लाखाच्या वरील शहरांमध्ये देशात दहावा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात नवी मुंबईने पहिला तर पुण्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहराला या स्पर्धेत तेरावा नंबर मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून दरवर्षी देशात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा राबविली जाते. ही स्पर्धा शहराच्या लोकसंख्येनुसार विविध गटात घेतली जाते. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर व सुरत शहराने संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. इंदोर शहराने सलग सातवेळा प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. तर नवीन मंबई शहराने तीसरा क्रमांक मिळवला आहे. दुसरा नंबर कोणालाही देण्यात आलेला नाही. या क्रमवारीत गतवर्षी 20 नंबरवर असलेल्या पुणे शहराने 10 नंबर मिळाला आहे. तर पिंपरी चिंचवड शहराला 13 व्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलने महाराष्ट्राने स्वच्छतेमध्ये चांगली कामगीरी करत देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रात नवीन मुंबई प्रथम तर पुणे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर 10 लाखाच्या वरील शहरांमध्ये पुण्याला 9 वा क्रमांक मिळाल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्ष स्पर्धेत पुणे शहराने फाईव्ह स्टार रँकींग मिळवण्याने आणि स्पर्धेत 10 क्रमांक पटकावल्याने गुरुवारी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त संदीप कदम, आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी केतकी घाडगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सांघिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव, यामुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील काळात लोकसहभागातून स्वच्छतेसाठी महापालिका आणखी प्रयत्न करेल.

– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका, पुणे.

हेही वाचा

Back to top button