पालिकेकडून थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

पालिकेकडून थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जप्तीपूर्व नोटिसा बजावूनही मिळकतकर न भरणार्‍या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 200 मिळकतींना सील लावण्यात आले आहेत. कारवाई तीव्र झाल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 7 हजार नोंदणीकृत मिळकती आहेत. कर संकलन विभागाकडून आतापर्यंत 650 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणार्‍या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

एक एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत 33 हजार 241 मिळकतधारकांना जप्ती नोटिसा धाडण्यात आल्या.
या मिळकतधारकांकडे तब्बल 584 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीसा देऊनही कर न भरणार्‍या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यास पोलिस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. जप्तीची नोटीस व पथक दारात पोहोचल्यानंतर 7 हजार 80 जणांनी 73 कोटी 28 लाखांचा कर भरला आहे. तर, 200 मिळकती सील करण्यात आल्या आहेत. सर्वांधिक फुगेवाडी येथील 38, किवळेतील 32, मोशी येथील 29 मिळकतींना सील लावण्यात आले आहे.

आता नळजोड खंडित करणार

वारंवार नोटीस देऊनही मिळकत कर न भरणार्‍या मिळकतींचे नळजोड खंडीत करण्यात येत आहेत. आतापर्यंत 17 मिळकतींचे पाणी बंद करण्यात आले आहे. यापुढे वेळेत कर न भरणार्‍या मिळकतीचे नळ जोड तोडण्यात येणार आहे, असा इशारा अधिकार्‍यांनी दिला आहे.

वेळेत मिळकतकर भरून जप्ती टाळा

महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तसेच, थकबाकीदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर न भरणार्‍या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 200 मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी वेळेत मिळकत कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असा आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news