आमदार, खासदारांनी वारंवार पक्षांतरे करू नयेत : माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू | पुढारी

आमदार, खासदारांनी वारंवार पक्षांतरे करू नयेत : माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आमदार, खासदारांनी सतत पक्षांतरे करू नयेत, लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी बुधवारी येथे केले. एमआयटीतर्फे आयोजित 13 व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

10 ते 12 जानेवारी दरम्यान भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वक्ते व लेखक प्रा. रामचरण, कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी, यू. टी. खादेर फरीद, उत्तर प्रदेशचे सतीश महाना, मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी उपस्थित होते. नायडू म्हणाले,’राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपापल्या राजकीय पक्षांशी एकनिष्ठ असावे. विचारधारा भिन्न असतील, दृष्टीकोन वेगळे असतील, पण संसदेच्या सभागृहात सर्वांनी देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवला पहिजे.

एकविचारानेच आपण नव्या युगातील भारत घडवू शकणार आहोत. राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी सतत पक्षबदल केले, की सर्वसामान्य जनतेचा त्यांच्या कामातील रस संपतो. जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडणे, हे धोक्याचे आहे. डॉ. रामचरण यांनी विद्यार्थ्यांमध्ये जात भावी जीवनात उपयुक्त ठरणारी चतुःसूत्री सांगितली. एमआयटीचे कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. गिरिसन यांनी आभार मानले तर डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा

Back to top button