Pune News : पालिकेच्या चार्जिंग स्टेशनला अखेर मिळाला मुहूर्त | पुढारी

Pune News : पालिकेच्या चार्जिंग स्टेशनला अखेर मिळाला मुहूर्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांपासून चर्चा सुरू असलेली महापालिकेची 21 चार्जिंग स्टेशन शुक्रवारपासून अखेर सुरू होणार आहेत. या ठिकाणी प्रतियुनिट 13 ते 19 रुपये दर आकारणी केली जाणार आहे.  शहरात ई व्हेईकलची संख्या वाढत आहे. यामध्ये दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या अधिक आहे. या वाहनांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने 2021 साली घेतला होता. महापालिकेने देखील अधिकार्‍यांसाठी ई कार घेतल्या होत्या, सुरुवातीला चार्जिंग स्टेशनची सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याने भोसरी येथे जाऊन वाहने चार्ज करून घ्यावी लागत होती.
महापालिकेच्या आवारात ही सुविधा निर्माण केली गेली असली तरी ती पुरेशी नाही. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा काढली होती. जागा उपलब्ध न होणे, संबंधित कंत्राटदाराबरोबर करारातील अटी शर्ती आदी तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता.  तसेच सदर चार्जिंग स्टेशन उभारण्याची निविदा ही ठराविक ठेकेदाराच्या फायद्यासाठीच काढली गेली आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला होता.
यात जागा वाटप नियमावलीचा भंग केला असून, सदर ठिकाणी आकारण्यात येणारा दर हा महावितरणच्या तुलनेत अधिक असल्याचा दावाही आपने केला होता. जुलै महीन्यापुर्वी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला चार स्टेशन उभी करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर इतर ठिकाणी स्टेशन उभी केली आहेत. शुक्रवारी (ता. 12 ) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या चार्जिंग स्टेशनचे उदघाटन होणार आहे.

प्रतियुनिट 13 ते 19 रुपये दराने आकारणी

शहरात 83 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभी केली जाणार आहे. त्यापैकी 21 चार्जिंग स्टेशनचे काम पुर्ण झाले आहे. या प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी दोन कार चार्जिंग करण्याची सुविधा आहे. प्रति युनिट 13 ते 19 रुपये इतर दर आकारला जाणार आहे. दर ग्राहकांच्या मागणीवर अवलंबुन आहे. जेथे प्रतिसाद जास्त तेथे दर जास्त ठेवला जाणार आहे.
महापालिकेला संबंधित ठेकेदार कंपनीला मिळणार्‍या निव्वळ नफ्यातील पन्नास टक्के वाटा मिळणार आहे. यातून महापालिकेला उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
– श्रीनिवास कंदुल,  मुख्य अभियंता, विद्युत विभाग
चार्जिंग स्टेशनच्या 21 ठिकाणांची नावे 
1) महापालिका पार्किंग
2) सावरकर भवन पार्किंग
3) गणेश कला क्रीडामंच
4) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह/बाळासाहेब ठाकरे कलामंदिर
5) बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
6) घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
7) टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय
8) बालगंधर्व नाट्यगृह
9) स्केचर्स शोरूम जंगली महाराज रोड पार्किंग
10) मॅकडोनाल्ड्स जंगली महाराज रोड पार्किंग
11) लेमन सलून एफ सी रोड पार्किंग
12) कुशल वाल स्ट्रीट एफ सी रोड पार्किंग
13) आर्ट स्टेशन पुणे एफ सी रोड पार्किंग
14) मिलेनिअम प्लाझा एफ सी रोड पार्किंग
15) पेशवे पार्क पार्किंग
16) मंडई आर्यन पार्किंग
17) गुलटेकडी पार्किंग
18) नवलोबा पार्किंग नं. 38 शुक्रवार पेठ
19) पद्मावती पंम्पिंग स्टेशन पार्किंग
20) पंडित भीमसेन जोशी ऑडीटोरीअम
21) संजय गांधी हॉस्पिटल
हेही वाचा

Back to top button