flowers in Palghar: पालघरमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव गडगडले | पुढारी

flowers in Palghar: पालघरमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव गडगडले

विक्रमगड : सचिन भोईर

पालघर जिल्ह्यात शेती उत्पादनामध्ये भातपिकाला प्राधान्य दिल्यानंतर आता फुलांच्या शेतीकडे शेतकरी वर्गाचा कल दिसून आला मात्र सध्या झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या फुलांचे भाव एकदम गडगडल्याचे दिसून आले आहेत. भातपीक घेतल्यानंतर अनेक गावांमध्ये फुलशेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या लाल -पिवळ्या फुलांची सर्वाधिक लागवड केली जाते. सध्या पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये झेंडूच्या फुलांची शेती बहरली आहे. झेंडूच्या लाल -पिवळ्या रंगामुळे डोळ्यांना आनंद मिळत आहे. मात्र लाल-पिवळ्या फुलांची लागवड केलेल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. (flowers in Palghar)

झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूच्या फुलांचे भाव एकदम गडगडले आहेत. पालघर जिल्ह्यातील फुलउत्पादक शेतकर्‍यांसाठी कल्याण आणि दादर या दोन महत्वाच्या बाजारपेठा असलेली ठिकाणे आहेत. या ठिकाणी येथील शेतकरी फुले नेऊन विकत असतात. किंवा येथील व्यापारी माल घेण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत येत असतात. मात्र या बाजार पेठेत सध्या परजिल्ह्यातील आणि परराज्यातील मोठ्या प्रमाणात फुलं विक्रीसाठी येत आहेत. त्याच्या फटका पालघर जिल्ह्यातील फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना बसला असून झेंडूच्या फुलांचा भाव गडगडला आहे. सध्या झेंडूच्या फुलांना फक्त 10 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे येथील झेंडूच्या फुलांची शेती केलेले शेतकरी संकटात सापडला आहे. (flowers in Palghar)

शेतकर्‍यांना झेंडूच्या फुलांना साधारण 35 ते 40 रुपये किलो भाव मिळाल्यास नफा मिळण्याची शक्यता असते. जर भाव 50 रुपयांपर्यंत किंवा त्यावरती गेल्यास चांगला नफा शेतकर्‍यांना मिळत असतो. मात्र सध्या मिळत असलेल्या मोबदल्यात शेतकर्‍यांनी झेंडूच्या फुलांच्या शेतीमध्ये टाकलेले पैसे देखील वसुल होणार नसल्याचे पहायला मिळत आहे.

Back to top button