हा निकाल न्यायालयीन नाही, तर.. : शरद पवार | पुढारी

हा निकाल न्यायालयीन नाही, तर.. : शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे अजिबात वाटत नव्हते. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल न्यायालयीन नसून राजकीय निकाल असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात जात हा निकाल दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी काय निकाल लागणार, याबाबत आधीच भाष्य केलेले होते. या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही.

या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे यांची बाजू भक्कम झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय संघटनेला महत्त्व दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले आहे. निकालाच्या दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळे निकाल काय लागणार हे स्पष्ट झाले होते. या निर्णयामुळे आम्हाला उत्तम संधी प्राप्त झाली आहे.

अन्य पक्षांबाबतही अशाच निकालाची शक्यता

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे, हे सांगण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली आहे. त्यासंदर्भात येत्या काही दिवसांत कार्यक्रम हाती घेण्यात येतील. अन्य पक्षांच्या बाबतीमध्येही असा निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button