राज्यात पुढील ६ महिने खडतर पाणीबाणी! | पुढारी

राज्यात पुढील ६ महिने खडतर पाणीबाणी!

सुनील कदम

कोल्हापूर :  मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात तब्बल 1600 टीएमसीहून अधिक पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी सहा महिने राज्यासाठी खडतर पाणीबाणीचे ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे ऐन उन्हाळ्यातील शेवटचे दोन महिने सिंचनासाठी उपसाबंदी लागू होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरणांत 566 टीएमसी कमी!

राज्यातील सर्व प्रकारच्या धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता 1705 टीएमसी आहे; मात्र यंदा राज्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने सध्या 138 मोठ्या, 260 मध्यम आणि 2596 लहान अशा एकूण 2994 धरणांमध्ये मिळून एकूण 24008.91 दशलक्ष घनमीटर (847 टीएमसी) इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण केवळ 49 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 83 टक्के (1413 टीएमसी) इतका होता. यावरून यंदा पाणीसाठा गतवर्षाच्या तुलनेत जवळपास 566 टीएमसीने कमी असल्याचे स्पष्ट होते.

तलावांमध्येही तुटवडाच!

राज्यात भूपृष्ठावरील उपलब्ध असणार्‍या पाण्याचे प्रमाण 3842 टीएमसी इतके आहे. यापैकी धरणांमधील 1705 टीएएमसी पाणीसाठा वजा केला तर 2137 टीएमसी पाणी हे राज्यातील छोटे-मोठे तलाव, लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव आणि प्रामुख्याने राज्यातील नद्यांच्या पात्रातून उपलब्ध होते. पावसाअभावी सध्या राज्यातील धरणांची जी अवस्था झाली आहे, नेमकी तशीच अवस्था राज्यातील तलाव आणि नदीपात्रांची आहे. पावसाअभावी तिथेही जवळपास 50 टक्के पाण्याची कमतरता जाणवत आहे. टीएमसीत सांगायचे तर भूपृष्ठावरील उपलब्ध पाण्यातही जवळपास 1068 टीएमसीची कमतरता जाणवणार आहे.

आगामी सहा महिने आव्हान!

यंदा राज्यातील कोयना, उजनी, जायकवडी यासह प्रमुख धरणे पूर्णक्षमतेने भरलेलीच नाहीत. अन्य धरणांचीही अशीच अवस्था आहे. राज्यातील बहुतांश धरणांमध्ये सध्या 10 ते 60 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. जूनमध्ये पावसाला सुरुवात होईपर्यंत म्हणजे आगामी सहा महिने राज्याला या उपलब्ध पाणीसाठ्यावरच गुजराण करावी लागणार आहे. ही बाब विचारात घेता आगामी सहा महिने हे राज्यासाठी पाणीबाणीचे ठरणार आहेत.

भूगर्भातही पाण्याचा ठणठणाटच!

भूजलातील पाणी उपसण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात वर्षाकाठी तब्बल 753 टीएमसी इतके पाणी भूगर्भातून उपसले जाते. यंदा पावसाच्या कमतरतेमुळे भूगर्भातील पाण्याची उपलब्धताही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूगर्भातून उपलब्ध होणार्‍या पाण्याच्या प्रमाणातही जवळपास 300 टीएमसीची कमतरता निर्माण होण्याचा अंदाज जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे.

Back to top button