लोकशाहीची दिवसाढवळ्या निर्लज्जपणे हत्या : आदित्य ठाकरे | पुढारी

लोकशाहीची दिवसाढवळ्या निर्लज्जपणे हत्या : आदित्य ठाकरे

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेना देत लोकशाहीची दिवसाढवळ्या निर्लज्जपणे हत्या केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उलटतपासणीला हजर राहिले नसल्याकडे; आमदार अपात्रता निकालात नमूद केल्याकडे लक्ष वेधले असता, आता जनताच खोके सरकारची उलटतपासणी करेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून पाटण तालुक्यातील तळमावले येथे महानिष्ठा, महान्याय सभा आयोजित केली होती. त्या सभेनंतर आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. यापुढे विधी मंडळात अशा प्रकारे गद्दारी झाल्यास भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल. अपात्रता प्रकरणावर सुनावणीवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उलटतपासणीला उपस्थित राहिले नाहीत असे निकाल पत्राच्या वाचनावेळी नमूद केल्याकडे लक्ष वेधले असता आदित्य ठाकरे यांनी आता जनताच खोके सरकारची उलटतपासणी करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच येणार्‍या निवडणुकीत जनताच ठरवेल खरे कोण? खोटे कोण? आणि गद्दार कोण? रोजगार नाही, नोकरी नाही, मग आपण का अन्याय सहन करतोय? असाही सवाल उपस्थित करीत आता गद्दार आणि थोतांडांना जागा नाही. परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे असेही आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तत्पूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार धोक्याने पाडून भाजपप्रणित खोके सरकार स्थापन करण्यात आले. दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला. मात्र हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात असल्याचा आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली. पण प्रगतीच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्राच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला. आम्हाला हैराण करून गद्दारांचे सरकार स्थापन केले. राज्याचा विकास खुंटला असल्याने सरकार विरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. देशविदेशातून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्याऐवजी कमी झाली आहे. मोठमोठे उद्योग गुजरातकडे वळविले जात आहेत. बेरोजगारी वाढली असल्याचे सांगत महायुती शासनावर आमदार ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

हेही वाचा : 

Back to top button