ओतूर ते काशी पायी पालखी : 2 हजार किलोमीटरचा प्रवास करणारा देशातील एकमेव पालखी सोहळा | पुढारी

ओतूर ते काशी पायी पालखी : 2 हजार किलोमीटरचा प्रवास करणारा देशातील एकमेव पालखी सोहळा

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) ते श्रीक्षेत्र काशी (उत्तर प्रदेश) या पायी पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि. 8) सकाळी 11 च्या सुमारास ओतूरच्या पांढरी मारुती मंदिराच्या मुख्य व्यासपीठावरून टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात दिमाखात प्रस्थान झाले. 70 दिवसांत तब्बल 2 हजार किलोमीटरचा प्रवास करणारा देशातील हा एकमेव पालखी सोहळा आहे.
श्रीक्षेत्र ओतूर येथे जगद्गुरु संत श्रीतुकाराम महाराजांचे गुरू संतश्रेष्ठ बाबाजी चैतन्य महाराजांचे संजीवन समाधी मंदिर आहे. चैतन्य महाराजांनी ओतूर ते काशी असा पायी वारीचा प्रवास करून काशी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तन केल्याची आख्यायिका सर्वज्ञात आहे. त्यामुळे ओतूर येथील चैतन्य महाराज संजीवन समाधीस्थळ व भव्यदिव्य पायी पालखी सोहळ्यास अन्यन्य साधारण महत्व आहे.

रविवारी (दि. 7) ओतूर येथील श्रीबाबाजी चैतन्य महाराज संजीवन समाधी मंदिरात महाअभिषेक व पादुका पूजन करून मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांचे हस्ते पूजन करून पालखी प्रस्थानाला प्रारंभ करण्यात आला. भाविकांची मांदियाळी, टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगांचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.

या वेळी चैतन्य काशीविश्वेश्वर पायी पालखी संस्थेचे संस्थापक ह.भ.प. गंगाराम महाराज डुंबरे व अध्यक्ष गणपत पाटील डुंबरे, ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे, विनायक तांबे, नरेंद्र तांबे, बबनराव भोरे, संभाजी तांबे, धनंजय डुंबरे, ह.भ.प. धोंडीभाऊ महाराज पानसरे, सुदाम घोलप, विठ्ठल शितोळे, प्रकाश फापाळे, किसन फापाळे, शरद गाढवे, वसंत तांबे, सुभाष गाढवे, बबन डुंबरे, विमल काशीद, मीनाक्षी लाहोरकर आदी उपस्थित होते.

70 दिवसांत 2 हजार किलोमीटरचा पायी प्रवास करणारा देशातील हा एकमेव पायी पालखी सोहळा आहे. विविध राज्यांतील शिवभक्तांचा जागोजागी पालखी सोहळ्यात मोठा वाढता सहभाग असतो. महाशिवरात्रीला महाराष्ट्रातूनदेखील हजारो शिवभक्त श्रीक्षेत्र काशी येथे ओतूरच्या पालखीत सहभागी होण्यासाठी येतात.

हेही वाचा :

 

 

Back to top button