ललित पाटील प्रकरण : डॉ. संजीव ठाकूर यांच्या विभागीय चौकशीसाठी समिती | पुढारी

ललित पाटील प्रकरण : डॉ. संजीव ठाकूर यांच्या विभागीय चौकशीसाठी समिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ललित पाटीलप्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांची आता विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून. समिती गठित करण्यात आली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यावर चौकशी अधिका-यांकडून त्वरित कार्यवाहीला सुरुवात केली जाईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला. मात्र, चौकशी अहवाल कधी सादर केला जाणार, याबाबत त्यांनी कोणतीही टिपण्णी केली नाही.

ससून रुग्णालयातील विकासकामांच्या उद्घाटनानंतर वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. ठाकूर यांचा पदभार काढून घेतल्यावर आता त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. ससूनमधील ललित पाटील प्रकरणातील कोणत्याही दोषीला पाठीशी घालणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक वारंवार बदलले जात असल्याबद्दल विचारणा केली असता, याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय बिले मंजूर करणारा कर्मचारी वर्ग दर सहा महिन्यांनी बदलण्याच्या सूचना
त्यांनी केल्या. वाघमारे म्हणाले, ’रेडिएशन थेरपी वगळता कॅन्सरसंदर्भात सर्व उपचार, शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात उपलब्ध आहेत. रेडिएशन थेरपी सध्याच्या जागेमध्ये सुरू करता येऊ शकते. त्यामुळे सध्या तरी कॅन्सर हॉस्पिटलसाठी वेगळया जागेची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमआरआय, सीटीस्कॅन सुविधांसाठी पीपीपी

राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा नाहीत, तर काही ठिकाणी अपु-या आहेत. सुविधांच्या उपलब्धतेनुसार ग्रीन फिल्ड आणि ब्राऊन फिल्ड अशी वर्गवारी केली जाणार आहे. एमआरआय आणि सीटी स्कॅन उपलब्ध आहे, मात्र अपुरी सुविधा असलेली महाविद्यालये ’ब्राऊन फिल्ड’मध्ये ग्राह्य धरली जातील. तर, ’ग्रीन फिल्ड’मध्ये नव्याने सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी, पीपीपी तत्त्वावर सुविधा सीजीएचएस दरामध्ये उपलब्ध होणार आहेत.

सात नवी वैद्यकीय महाविद्यालये

शासनाने सात ते आठ जिल्ह्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये मंजूर केली आहेत. सध्या केवळ अहमदनगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नाही. गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वाशिम, हिंगोली येथील महाविद्यालये यावर्षी सुरू होतील. वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयास थोडा विलंब होईल.

हेही वाचा

Back to top button