‘मकाई’ व्यवस्थापनाला 25 तारखेपर्यंत अल्टिमेटम | पुढारी

‘मकाई’ व्यवस्थापनाला 25 तारखेपर्यंत अल्टिमेटम

महेश पांढरे

सोलापूर : शेतकर्‍यांचे ऊस बिल गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून दिलेले नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कारखाना व्यवस्थापन आणि शेतकर्‍यांची एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावर कारखाना व्यवस्थापनाने येत्या 25 जानेवारीपर्यंत शेतकर्‍यांची देणी देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी मकाई कारखान्याला 25 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला असून, जर 25 जानेवारीपर्यंत शेतकर्‍यांची देणी दिली नाहीत तर कारखान्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्यावर जिल्हाधिकार्‍यांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करून शेतकर्‍यांची देणी द्यावीत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती. कारखान्याकडे शेतकर्‍यांनी ऊस दिल्याची जवळपास दीड हजार शेतकर्‍यांचे 26 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून दिली जात नाही. त्यामुळे संबधित कारखान्यावर ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करावी आणि कारखान्याची मालमत्ता विकून शेतकर्‍यांचे पैसे द्यावेत अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांतून करण्यात आली होती.

त्यासाठी शेतकरी प्रतिनिधी, कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनाची सामुहिक बैठक गुरुवारी घेण्यात आली. यावेळी तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांनी काही दिवसाची मुदत द्या आम्ही शेतकर्‍यांची देणी देऊ, असा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे ठेवला. शेतकरी प्रतिनिधी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मध्यस्थी करत कारखान्याला येत्या 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली. त्यानंतरही हि देणी न दिल्यास आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकर्‍यांची देणी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button