जळगाव : गुणवत्ता मूल्यांकन निकषाधारे जिल्ह्यातील चार शाळांमध्ये पथदर्शी अभ्यास

जळगाव : गुणवत्ता मूल्यांकन निकषाधारे जिल्ह्यातील चार शाळांमध्ये पथदर्शी अभ्यास
Published on
Updated on

जळगाव; महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून SQAAF स्कूल क्वॉलिटी असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडेशन फ्रेमवर्क तयार करण्यात आला आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकनाच्या या निकष निर्मिती आराखड्याचा पथदर्शी अभ्यास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे करण्यात आला. त्यासाठी राज्यभरातील 54 शाळांची निवड करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील चार शाळांमध्ये राज्य समिती सदस्यांनी भेटी देऊन मूल्यांकन केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे व अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली SQAAF तज्ज्ञ व राज्य समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रमोद आठवले, दंगल पाटील व शामकांत रूले यांनी जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद शाळा क्र. 35 भुसावळ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एकुलती, ता. जामनेर, मनपा सेंट्रल स्कूल 2 जळगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसगाव, ता. मुक्ताईनगर अशा चार शाळांना भेटी देऊन मूल्यांकन आराखड्याची पडताळणी केली. राज्य समितीने भेटी दिल्यावर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखड्यात नमूद निकषानुसार क्षेत्र, मानके, पुरावे यांची माहिती पडताळून पाहण्यात आली. तसेच अंतर्गत व बाह्य घटकांचे मूल्यांकन करून शाळा सुधारात्मक बाबी देखील दर्शविण्यात आल्या. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व प्रमाणन आराखड्यात अभ्यासक्रम व मूल्यमापन, प्रवेश व पायाभूत सुविधा, मानवी संसाधने व नेतृत्व, समावेशक पद्धती व लिंग समानता, व्यवस्थापन देखरेख व शासन आणि लाभार्थी समाधान अशी एकूण 6 क्षेत्रे, 58 उपक्षेत्रे आणि 123 मानके आहेत. या प्रत्येक मानकांचे चार स्तर असून पहिला प्रारंभिक, दुसरा प्रगतशील, तिसरा प्रवीण आणि चौथा प्रगत असे आहेत. प्रत्येक स्तराची वर्णन विधाने आहेत.

पथदर्शी अभ्यासासाठी निवड करण्यात आलेल्या शाळांना भेटी देण्यात येवून गुणवत्ता मूल्यांकन व प्रमाणन आराखड्यात असलेल्या क्षेत्रनिहाय मानकांची पडताळणी केली. मूल्यांकन प्रणालीतील निष्कर्षाच्या आधारे आपली बलस्थाने व दुर्बलता ओळखण्याची क्षमता शाळांमध्ये निर्माण होते. त्यासाठी मूल्यांकन प्रणालीचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व प्रमाणन आराखडा तज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी शाळा भेटीदरम्यान सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news