कळस परिसरामधील समस्या सोडविणार : सहायक आयुक्त विजय नाईकल | पुढारी

कळस परिसरामधील समस्या सोडविणार : सहायक आयुक्त विजय नाईकल

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय नाईकल यांनी कळस येथे भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी ऐकून घेतल्यावर त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
कळस स्मशानभूमीभोवती संरक्षकभिंतीची उभारणी करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व येथे रात्रीच्या वेळीही सुरक्षारक्षक नेमावेत, अशा मागण्या आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के व शिवसेनेचे शशिकांत साटोटे यांनी नाईकल यांच्याकडे केल्या होत्या.

कळस येथील आरोग्य केंद्रात फक्त ओपीडी चालू आहे. येथे रुग्णांना सिटी स्कॅनसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे साटोटे यांनी निदर्शनास आणून दिले. आरोग्य केंद्राच्या तीन मजली इमारतीचा पूर्णपणे उपयोग होत नाही. त्यामुळे येथे प्रसूतिगृह चालू करावे, अशी मागणी ’आप’चे अमित म्हस्के यांनी केली. यावर नाईकल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी तुळशीराम नागटिळक, अमोल म्हस्के,अमित म्हस्के, शशिकांत साटोटे, दीपक चावरीया, बबन पालकर आदींसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कळस स्मशानभूमीसाठी सुमारे दहा लाख रुपये निधी उपलब्ध झालेला असून, लवकरच येथील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जाणार आहेत. इतर कामे मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाला पाठविण्यात येईल.

– विजय नाईकल, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button